आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Crime Branch Police, Divya Marathi

कोटीची खंडणी मागणारे तिघांना गुन्हे शाखा पोलिसांनी केले जेरबंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी विशाल एडके व विक्की बिंद्रा - Divya Marathi
आरोपी विशाल एडके व विक्की बिंद्रा
औरंगाबाद - प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. अजीज अहमद कादरी यांच्या कांचनवाडीतील एक एकर जमिनीवर अतिक्रमण करून एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी तगादा लावणार्‍या विशाल प्रकाश एडके (28) आणि अग्याकारसिंग ऊर्फ विक्की मनजितसिंग बिंद्रा (दोघेही रा. पदमपुरा), गौतम कचरू पगारे (44) यांना आर्थिक आणि गुन्हे शाखा पोलिसांनी जेरबंद केले. संभाषणाच्या सात सीडींचा सबळ पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे.
खंडणी न दिल्यामुळे आरोपींनी जागेवर अतिक्रमण करत तेथे झेंडे गाडून महिलेमार्फत डॉ. कादरींविरुद्ध विनयभंगाची खोटी तक्रार दिली होती. त्यांनी कंटाळून पोलिसांत तक्रार दिल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा कारवाई करण्यात आली. डॉ. कादरी यांचे पडेगावात मनोविकार हॉस्पिटल आहे. त्यांनी शेख मोहंमद अकिल यांच्याकडून 28 नोव्हेंबर 2000 मध्ये गट क्र. 16 मधील एक एकर सात गुंठे जमीन त्यांनी खरेदी केली होती. त्यांची तेथे 14.5 एकर जमीन होती. त्यापैकी काही जमीन तलावात गेली व उर्वरित कादरी यांनी खरेदी केली. दरम्यान, 2011 मध्येच त्यांचा शेजारी शमशोद्दीन खानने डॉ. कादरींच्या जमिनीवर फलक लावून बुलडोझरने सपाटीकरणाचे काम सुरू केले होते. त्यानंतर डॉ. कादरी यांनी खानविरुद्ध 6 एप्रिल 2011 रोजी उस्मानपुरा ठाण्यात तक्रार दिली. चुकीचा नकाशा तयार करून जमीन बळकावण्याचा त्याचा डाव होता. मोजणी झाल्यानंतर जमीन डॉ. कादरी यांची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर जमिनीवर दोन खोल्या बांधून एक वॉचमन तेथे ठेवण्यात आला होता.
जानेवारीपासून धमकीसत्र
जानेवारी 2014 मध्ये तीस जणांचा गट डॉ. कादरी यांच्या प्लॉटवर आला. त्यांनी वॉचमनला बेदम मारहाण करीत हुसकावून लावले व पुन्हा जमिनीवर अतिक्रमण केले. अनिल सदाशिवे नावाच्या व्यक्तीने डॉ. कादरी यांना धमकी देण्यास सुरुवात केली. जमिनीचे 25 लाखांत मुखत्यारपत्र केले असून आता शेख मोहंमद अकिल यांच्याशी बोलून फायदा नसल्याचे त्याने सांगितले. आपल्याशीच तडजोड करावी लागेल, असे सदाशिवे याने डॉ. कादरींना धमकावले. 27 फेब्रुवारीला सायंकाळी 5.30 वाजता कादरी यांना फोन आला. या वेळी प्लॉटच्या बाबतीत बोलायचे असल्याचे सांगत प्लॉटवरील झेंडे, फोटो कोणी काढला, अशी विचारणा सदाशिवेने केली. आम्ही नगरसेवक रावसाहेब गायकवाड यांना सांगून 10 ते 15 जणांना आणून झेंडा लावू आणि पुतळा बसवून तुमच्या विरोधात पोलिस आयुक्तांना अर्ज देऊ, अशी धमकी दिली. त्यानंतर डॉ. कादरी यांनी छावणी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. 27 फेब्रुवारीला वाल्मी कार्यालयातील शिपाई पगारे याच्यामार्फतही फोन करून धमकी देण्यात आली.
यानंतर 4 मार्च रोजी लक्ष्मीबाई मांगीलाल चव्हाण (रा. शिक्षक कॉलनी, पैठण) कांचनवाडीतील जमिनीच्या ठिकाणी गेली. तेथे जाऊन तिने वॉचमन अन्वरच्या मोबाइलवरून डॉ. कादरी यांना फोन केला. ‘ही जागा आमची आहे, इथे येऊन कागदपत्रे दाखवा,’ असे ती म्हणाली. यावर डॉ. कादरी यांनी अन्वरला तुम्ही कागदपत्रे दाखवा, मी तेथे येत नाही, असे तिला खडसावले. त्यानंतर लक्ष्मीबाईने त्यांच्याविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात मारहाण आणि विनयभंग करण्यात आल्याची खोटी तक्रार दिली. धमक्यांचे सत्र पुढेही असेच सुरू होते.
..तर विनयभंगाला बलात्कारात बदलू
डॉ. कादरींवर विनयभंगाऐवजी बलात्काराचा गुन्हा दाखल करू व इतर जागांवरदेखील अतिक्रमण करू असे एडकेने फोनवरून धमकावले. लक्ष्मीबाईला माझ्यामार्फत 10 लाख रुपये देऊन प्रकरण मिटवतो, अशी खात्री त्याने दिली. तसेच गुन्हा दाखल झाल्यास बदनामी होईल, अशी भीती त्याने डॉ. कादरींना दाखवली. डॉ. कादरी यांनी मंगळवारी पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांच्याकडे सबळ पुरावे सादर केले. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक विश्वास पाटील, सुभाष खंडागळे यांच्या पथकाने मंगळवारी रात्री बिंद्रा, एडकेला व बुधवारी पगारेला अटक केली. छावणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने बिंद्रा व एडकेला 14 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. भक्कम पुरावा गोळा करण्यासाठी संभाषणाच्या सीडी मुंबईच्या कलिना येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याचे निरीक्षक आघाव यांनी सांगितले.
डीसीपी जाधव यांच्या नावाचा गैरवापर
पैसे देऊन प्रकरणाच्या सोक्षमोक्षासाठी आरोपींनी पोलिस उपायुक्त जय जाधव यांच्या नावाचा गैरवापर केला. 9 मार्चला दुपारी 1 वाजता डॉ. कादरींना फोन लावून बिंद्राने ‘डीसीपी जाधव बोलतोय! तुमच्यामुळे वैतागलो आहे,’ असे सांगितले. लोक मोर्चाच्या तयारीत असून प्रकरण गंभीर बनल्याचा बनाव त्याने रचला. अटक टाळण्यासाठी स्वत:हून प्रकरण मिटवा असा सल्लाही त्याने कादरींना दिला. दरम्यान, हृदयविकाराचा त्रास जाणवत असल्याने त्यांनी मुलगा डॉ. मिराज कादरी यांना इंदूरहून औरंगाबादला बोलवून घेतले. यानंतर एडकेने 10 मार्चला डॉ. मिराज यांना फोन करून तडजोड करण्यासाठी खंडणी मागितली. लक्ष्मीबाई एक कोटी मागत असून 60 लाखांत तडजोड करू, असे आश्वासन त्याने दिले. खंडणी न दिल्यास डॉ. कादरींवर गुन्हा दाखल होईल, असेही एडकेने धमकावले.