आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - कामचुकार पोलिस कर्मचार्यांना कामाला लावण्यासाठी पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया यांनी त्यांच्या परिमंडळातील 7 पोलिस ठाण्यांमध्ये 659 कर्मचारी व 55 अधिकार्यांसाठी 20 कलमी कार्यक्रम आखला आहे. त्यानुसार बीट अंमलदार व कर्मचार्यांचा आठवडाभराच्या कामांचा अहवाल ठाण्याच्या वरिष्ठ अधिकार्याकडे सोपवला जाईल.
दोन वर्षांपूर्वी चावरिया यांनी परिमंडळ-2 चे उपायुक्त म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर विविध ठाण्यांमध्ये कामांचा आढावा घेतल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की, त्यांच्या हद्दीतील सातपैकी बहुतांश ठाण्यांमध्ये काही कर्मचारी कामचुकारपणा करतात. लोकसभा निवडणुकीच्या काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व कामचुकार कर्मचार्यांना जरब बसवण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. पोलिसांना 30 प्रकारच्या सूचनाही देण्यात आल्या.
चावरिया यांनी तपास, अर्ज चौकशी, प्रतिबंधात्मक कारवाई, दारू-जुगाराचे छापे, रात्रगस्त, परेड, बंदोबस्त, नाकाबंदी, मोहल्ला व वॉर्ड बैठक, ज्येष्ठ नागरिक भेट, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी, फरार आणि गुन्ह्यातील आरोपी तसेच विशेष कामगिरी असा 20 कलमी कार्यक्रमाचा तक्ता बनवला आहे. तो पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी स्वत: भरून दर सोमवारी पोलिस ठाण्याच्या अधिकार्याकडे सादर करायचा आहे. यात कामचुकारपणा करणार्या कर्मचार्यांना सक्त ताकीद दिली जाईल.
तक्रारींचा कसून तपास करा : चोर्या, गुन्हे रोखण्यासाठी व घडलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी कर्मचार्यांनी काम करावे. बीटमध्ये घडलेले गुन्हे व अदखलपात्र गुन्हे तसेच सर्व तक्रारींचा कसून तपास करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. चौकशी आणि नियमानुसार गुन्ह्याचे दोषारोपपत्र पडताळणीसाठी तसेच परवानगीसाठी कमीत कमी 15 दिवस अगोदर अहवाल उपायुक्त व सहायक पोलिस आयुक्तांकडे सादर करावा लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांवर नजर ठेवा
लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून चावरिया यांनी राजकीय व्यक्तींच्या बारीकसारीक घडामोडींवर तसेच सामाजिक, शैक्षणिक, जातीय आणि समाजविघातक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी महिला/ मुलींच्या छेडछाडीचे प्रकार घडणार नाहीत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे त्यांनी सांगितले असून धार्मिक स्थळी विटंबनेसारखे प्रकार घडणार नाहीत याबाबत योग्य ती खबरदारी घेऊन त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे या कार्यक्रमात नमूद करण्यात आले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.