आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीड हजार घरांच्या चाव्या मिळण्याचा मार्ग मोकळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर एक महिन्यापूर्वी बांधकामांवर टाकलेली बंदी जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी मागे घेतली. त्यामुळे दिवाळीत सुमारे दीड हजार नागरिकांना स्वत:च्या स्वप्नातील घराच्या चाव्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी मनपा हद्द वगळता शहरातील सर्वच भागांतील बांधकामांवर बंदी घालत उद्योगाच्या पाण्यात २० टक्के कपात करण्यात आली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असल्याने बांधकाम बंदी आणि पाणी कपात मागे घेण्यात आली. बांधकाम बंदीच्या निर्णयामुळे सातारा, देवळाई, मिटमिटा, करमाड, हर्सूल, पडेगाव, वाळूज येथील ४० हजारांवर बांधकामांना फटका बसला होता. मनपा हद्दीत बांधकाम बंदी नसली तरी मागणी नसल्याने या भागातील बांधकामेही कमी झाली. पाणीटंचाईमुळे विकासक तसेच खासगी व्यक्तींनी बांधकामे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट जाणवत होते. बांधकाम बंदीनंतरही सातारा परिसरात बांधकामे सुरू होते त्यामुळे १५ ऑगस्टनंतर येथील सक्ती वाढवण्याचे प्रशासनाने ठरवले होते. बांधकाम बंदीमुळे बांधकाम विभागाला नेमका किती फटका बसला हे आता सांगता येणार नसल्याचे क्रेडाईचे अध्यक्ष पापालाल गोयल यांनी म्हटले. बांधकाम बंदी असली तरी सर्व बांधकामे बंद झाली नव्हती, असे प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही खासगीत मान्य केले. क्रेडाईचे राज्य उपाध्यक्ष प्रमोद खैरनार, विकासक विकास चौधरी म्हणाले, बंदी उठवण्याचा निर्णय बिल्डरांसाठी दिलासा देणारा आहे. यामुळे सुमारे दीड हजार फ्लॅट, रो-हाऊसच्या चाव्या िदवाळीत ग्राहकांच्या हाती देणे आम्हाला शक्य होणार आहे. शिवाय दिवाळी-दसऱ्याला बुकिंगही होऊ शकते.

उद्योगाच्या उत्पादनांवर परिणाम नाही
जायकवाडीतीलपाणीसाठा खालावल्याने अनेकांनी पाण्याचा वापर कमी केला होता. प्रशासनाने २० टक्के पाणी कमी केल्याने उद्योगाच्या उत्पादनावर फारसा परिणाम झाला नसल्याचे सांगण्यात येते. बांधकाम बंदी तसेच उद्योगाच्या पाणी कपातीच्या निर्णयाची जवळपास एक महिना अंमलबजावणी झाली. जोरदार पावसामुळे प्रशासनाची ही बंदीही दूर झाल्याने बांधकामांना वेग येईल, अशी अपेक्षा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.