आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Each Year Chikalthana Airporat Loses 25 Croress

चिकलठाणा विमानतळाला वर्षाकाठी होतोय 25 कोटींचे नुकसान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - देशातील सर्वच छोटी शहरे विमानसेवेने जोडण्याची पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांनी नुकतीच घोषणा केली. पण ती किती अव्यवहार्य आहे हे लहान शहरात सध्या अस्तित्वात असणार्‍या विमानतळांच्या स्थितीवरून लक्षात येते. मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद विमानतळे डबघाईला आली असून त्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. एकटे औरंगाबाद विमानतळ वर्षाकाठी 20 ते 25 कोटी रुपयांचे नुकसान सहन करून रडतपडत सुरू आहे.


गेल्या महिन्यात मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनस-2 चे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी जास्तीत जास्त छोटी शहरे हवाई वाहतुकीद्वारे जोडण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. त्यांची री ओढत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही लहान शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याची गरज व्यक्त केली. निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही नेत्यांच्या घोषणा टाळ्या घेऊन गेल्या. पण त्या किती पोकळ आहेत हे मराठवाड्यातील विमानतळांच्या स्थितीवरून लक्षात येते.


परदेशवारीचे स्वप्न हवेतच
औरंगाबादेत निझामांच्या काळापासून धावपट्टी होती. 1952 पासून तेथे विमानतळ असल्याचे उल्लेखआढळतात, तर 70 च्या दशकात विमानतळ प्राधिकरणाच्या अखत्यारीत आले. 21 नोव्हेंबर 2008 रोजी सुमारे 100 कोटी रुपये खचरून आधुनिकीकरण करण्यात आलेल्या विमानतळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी हज यात्रेकरूंना घेऊन एक विमान जेद्दाहला उडाले. लवकरच इतर आंतरराष्ट्रीय शहरही औरंगाबादशी जोडले जातील अशी शहरवासीयांची अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. 9300 फूट धावपट्टी असणार्‍या या विमानतळावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व सुविधा आहेत. येथे कितीही मोठे विमान उतरू शकते. पण प्रत्यक्षात जेद्दाह वगळता एकही आंतरराष्ट्रीय विमान येथे आलेले नाही. जेद्दाहचे विमानही व्यावसायिक स्वरूपातील नव्हते.


24 तासांत फक्त 6 विमाने; एक हजार प्रवाशांची रेलचेल
येथे एका वेळी किमान 5 ते 6 विमाने उभी राहू शकतात. मात्र, सध्या येथे दिवसभरात मुंबईसाठी 4, तर दिल्लीसाठी 2 अशी केवळ 6 विमाने येथे येतात. आधुनिकीकरणापूर्वी दिल्लीसाठी 1, तर मुंबईसाठी 4 अशी 5 विमाने उड्डाण करायची. 2011 मध्ये दिल्लीसाठी दोन नवीन विमाने सुरू झाल्याने विमानांची संख्या 7 झाली, तर किंगफिशरने हैदराबाद आणि स्पाइस जेटने त्रिवेंद्रमपर्यंत सेवा सुरू केल्यामुळे ही संख्या 9 पर्यंत गेली. खूप पूर्वी उदयपूरसाठीही एक विमान होते. परंतु कमी प्रवाशांची कारणे देत एक-एक विमान बंद होत गेले. आता ही संख्या 6 वर घसरली. यातून दररोज 1 हजार प्रवासी प्रवास करतात. सध्या एअर इंडिया, स्पाइस जेट, जेट एअरवेजची विमाने शहरात उड्डाण करतात.


उत्पन्न तोकडे, खर्च मात्र अधिक
100 कोटी खर्च करूनही विमानसेवा देणार्‍या अधिकाधिक कंपन्यांना आकर्षित करण्यात हे विमानतळ कमी पडले. उत्पन्न तोकडे, खर्च अधिक अशी परिस्थिती आहे. अग्निशामक, एटीसी, एअरलाइन्स, सीआयएसएफ, कर्मशियल अशा विमानतळ प्राधिकरणाच्या विविध 8 विंग्जमध्ये 400 हून अधिक कर्मचारी काम करतात. त्यांच्या वेतनावर सर्वाधिक खर्च होतो. वीज बिल, मेंटेनन्स, गार्डनिंग तसेच वास्तूची डिप्रीसिएशन कॉस्ट अशा विविध हेड्सखाली विमानतळ प्राधिकरणाला वर्षाकाठी तब्बल 20 कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागते. धावपट्टीचे भाडे, एटीएम, रेस्टॉरंट, कॅफे हाऊस, बुक स्टॉल, हँडिक्राफ्टच्या दालनातून मिळणारे उत्पन्न तोकडे पडत आहे.


सुरुवातीपासून तोट्यातच
औरंगाबादचे विमानतळ सुरुवातीपासून कधीच फायद्यात नव्हते. आधुनिक ीकरणापूर्वी हा तोटा वर्षाकाठी 4 कोटी रुपयांचा होता. आता तो 20 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. येथे सर्व सुविधा आहेत. पण नवीन ऑपरेटर्संना खेचण्यात आम्ही अपयशी ठरलोय. असे असले तरी हे विमानतळ केवळ जनतेसाठी सुरू आहे. आमच्या इतर विमानतळांवरून आम्ही हे नुकसान भरून काढतोय. हीच बिझनेस स्ट्रॅटेजी आहे. डी.जी.साळवे, विमानपत्तन निदेशक