आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Electricity Issue In Marathwada

मराठवाड्यात वीज बिलाचे 4820 कोटी थकीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मराठवाड्यातील वीज ग्राहकांनी वीज बिलाची 4820 कोटी रुपये रक्कम थकवली आहे. यामध्ये 90 टक्के कृषी ग्राहकांचा समावेश आहे. थकीत वीज बिलांमुळे 14 ते 16 तास भारनियमन केले जात आहे. याचा फटका शेतकर्‍यांबरोबरच विद्यार्थी, व्यावसायिक व आणि शासनालाही बसत आहे. कृषी वीजग्राहक वीज बिलाचा भरणा का करत नाही, या विषयी ‘दिव्य मराठी’ ने जाणून घेतले असता, चांगली सेवा मिळत नसल्याच्या सबबीखाली वीज बिले थकीत ठेवली जात असल्याचे प्रमुख कारण पुढे आले आहे. शिवाय अवाच्या सव्वा वीज बिले आकारली जात असून वीज बिल माफ होईल, अशीही शेतकर्‍यांची धारणा आहे. आर्थिक स्तर खालावलेला असणे, हेही महत्त्वाचे कारण वीज बिल थकीत ठेवण्यामागे दिसून आले.


24 तासांपैकी आठ ते दहा तास वीजपुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये विजेचा लपंडाव, कमी दाबाने किंवा उच्च दाबाने वीजपुरवठा होतो. यामुळे विद्युतपंप जळून शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होते. शेतकर्‍यांना वीज वापराच्या तुलनेत अवाच्या सव्वा वीज बिल दिले जात आहे. त्यात अधिभाराची रक्कम जास्त आहे. वीज बिल माफ होईल, या आशेनेदेखील अनेकांनी पंधरा ते वीस वर्षांपासून वीज बिलाचा भरणा केलाच नाही. त्यामुळे मराठवाड्यातील वीज ग्राहकांकडे 4820 कोटी रुपये थकीत आहेत. प. महाराष्ट्रात याउलट परिस्थिती आहे. या विभागातील शेतकरी, घरगुती, उद्योजक आदी वीज ग्राहक नियमित वीज बिलाचा भरणा करतात. त्यामुळे त्यांना 24 तास वीज उपलब्ध केली जात आहे. कोकण, पुणे, कोल्हापूर व नागपूर शंभर टक्के भारनियमनमुक्त आहे.


बिल भरले तरच भारनियमनातून मुक्ती
नियमित वीज बिलाचा भरणा केला, तरच राज्य भारनियमन मुक्त होईल हे शासनाने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. त्यासाठी महावितरण विविध कार्यक्रम, कीर्तनातून ग्राहकांना जागृत करत आहे. राम दोतोंडे, मुख्य महाव्यवस्थापक, जनसंपर्क विभाग, महावितरण, मुंबई.


योग्य प्रमाणात वीज मिळत नाही
पश्चिम महाराष्ट्रात 24 तास वीजपुरवठा केला जातो. मात्र, मराठवाड्याला 14 ते 16 तास भारनियमन केले जाते. कमी दाबाने वीजपुरवठा होतो. त्याचा शेतकर्‍यांना फायदा होत नाही. अनेक वर्षांपासून वीज कनेक्शन बंद आहेत. मात्र, त्याची लाखो रुपयांची बिले देण्यात आली आहेत. उत्पादन खर्च गृहीत धरत नाही. अवाच्या सव्वा वीज बिल कोण भरेल ? गुणवंत हंगरगेकर पाटील, प्रांताध्यक्ष, शेतकरी संघटना. नांदेड.

महावितरणच दोषी
सरकारने वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले. मात्र, पाळले नाही. एकदाच लाखोंची बिले देण्यात आली. शेतकर्‍यांचे उत्पन्न, त्यांचा वीज वापर याचा विचार व्हावा. कैलास तवार, मराठवाडा अध्यक्ष, शेतकरी संघटना.

मानसिकता बघडून थकबाकी वाढते
मताच्या राजकारणासाठी पुढारी वीज बिल माफीची खोटी आश्वासने देतात. त्यामुळे लोकांची मानसिकता बिघडून थकबाकीचे प्रमाण अधिक असल्याचे महावितरणच्या सात अभियंत्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.