आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Garden, Divya Marathi

खडकाळ मैदानावर फुलले नंदनवन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हडको, एन-11, सुदर्शननगरात खडकाळ मैदानावर नंदनवन फुलवण्यात आले आहे. वर्षानुवर्षे ओसाड पडलेली आणि त्यामुळेच टवाळखोरांचा अड्डा म्हणून प्रसिद्ध झालेली 2 एकर पडीक जमीन हिरवळ, फुले, खेळण्या अणि जॉगिंग ट्रॅकमुळे दृष्ट लागेल अशी झाली आहे. हर्सूल तलावातील गाळाचा वापर करत ही किमया साधण्यात आली आहे. दुसरीकडे रेन वॉटर हार्वेस्टिंगचे दोन प्लांट उभारल्यामुळे परिसरातील जलपातळी वाढवण्यातही यश आले आहे. स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांची सकारात्मक दृष्टी यामुळे हे शक्य झाले. या नंदनवनातील प्रेरणारूपी बीज इतरांनाही उपयुक्त ठरावे यासाठी हा वृत्तांत...
सुदर्शननगर-मयूरनगर वॉर्डात दीपनगर नावाची वसाहत आहे. तेथे सुमारे 2 एकर परिसरात विस्तारलेले महानगरपालिकेचे जुने उद्यान होते; पण उद्यानाच्या कुठल्याही खाणाखुणा तेथे राहिल्या नव्हत्या. मोकळी ओसाड जागाच उद्यानाच्या जागी दिसत होती. खेळण्या, लॉन किंवा अन्य कोणत्याच सुविधा नव्हत्या. जमीनही खडकाळ असल्याने कोणी येथे झाडे लावण्याचा प्रयत्न केला नाही. मुळात पाणीच नसल्याने झाडे जगण्याची
शक्यता कमी होती.
टवाळखोरांचा अड्डा
ओसाड आणि खडकाळ मैदानावर रोडरोमिओ, टवाळखोरांचा अड्डा जमत असे. दिवसाढवळ्या पत्ते, जुगार, सोरट्याचे डाव येथे रंगायचे. संध्याकाळ होताच दारुड्यांची मैफल भरायची. मग त्यातून शिवीगाळ, हाणामा-या असे प्रकार सर्रास होत असत. मुली आणि महिलांना येथून जीव मुठीत घेऊनच जावे लागे. परिसरातील नागरिकांसाठी हे उद्यान डोकेदुखी ठरत होते. रहिवाशांनी याबाबत नगरसेवक किशोर नागरे यांच्याकडे तक्रारी सुरू केल्या. हवे तर उद्यान रद्द करून येथे इमारती बांधा, पण या जाचातून सुटका करा, अशी विनंतीही नागरिकांनी वैतागून केली.
गाळाने ओतला जीव
परिसरात हे एकमेव मोठे उद्यान असल्याने त्याचा विकास करण्याचा निर्णय नागरे यांनी घेतला; पण ही खडकाळ जमीन असल्याने येथे काहीच करता येणे शक्य नव्हते. वरवर माती दिसत असली, तरी फुटाफुटावर खडक लागतो. अशा ठिकाणी नेमके काय करता येईल यासाठी त्यांनी तज्ज्ञांशी चर्चा केली. गेल्या उन्हाळ्यात सर्वत्र दुष्काळाचे चटके जाणवत होते. हर्सूल तलाव कोरडा पडला होता. यातील गाळ उपसण्याचे काम मनपाने घेतले होते. पालिका हा गाळ शेतक-यांना मोफत देत होती. यातूनच हा गाळ या मैदानावर अंथरला तर, असा विचार पुढे आला. तज्ज्ञांनीही हा खूप चांगला उपाय असल्याचे सांगितले. त्यानंतर 70-80 ट्रक गाळ येथे आणून तो संपूर्ण मैदानात पसरवला. मैदानावर सर्वत्र गाळाचा एक थर जमा झाला. खेळण्या, जॉगिंग ट्रॅकवर गर्दी : ही कामे पूर्ण झाल्यावर याचे नामकरण ‘शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे उद्यान’ असे करण्यात आले. नुकतेच याचे औपचारिक उद्घाटन झाले. लहान मुलांसाठी येथे खेळण्या, तर मोठ्यांसाठी 350 मीटरचा जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. येथे हजारो नागरिक जॉगिंगसाठी येतात, तर बच्चे कंपनीही संध्याकाळी गर्दी करते. उद्यानाच्या मधोमध कारंजे बसवण्यात आले आहे. वाघाचे भव्य चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेते. भविष्यात मुलांना प्राणी आणि पक्ष्यांची माहिती देण्यासाठी उद्यानाच्या भिंतींवर आणखी चित्रे लावण्याचा नागरे यांचा मानस आहे.
वॉचमनची सोयही केली : मोठ्या प्रयत्नातून येथे पाणी पोहोचले. आता येथे हिरवळ लावायची होती; पण त्याकडे लक्ष देण्यासाठी कायमस्वरूपी वॉचमनची आवश्यकता होती. मग त्यांनी येथे वॉचमनसाठी एक खोली बांधली. राहण्याचे भाडे न घेण्याच्या बोलीवर वॉचमन नेमण्यात आला.
रेन वॉटर हार्वेस्टिंगचा फायदा : उद्यान तर बहरलेच, पण येथे उभारण्यात आलेल्या रेन वॉटर हॉर्वेस्टिंगच्या दोन प्लांटमुळे परिसरातील बोअरला पाणी लागले आहे. भूगर्भातील पाणीपातळी वाढल्यामुळे बंद असणा-या हातपंपांनाही पाणी लागले आहे.
मी लहानपणापासून हे उद्यान बघत आले आहे. पूर्वी संध्याकाळी येथून जाण्याची भीती वाटायची, पण आता याचे हे रूप पाहून विश्वासच बसत नाही. लोकप्रतिनिधींनी ठरवले तर अशी अनेक चांगली कामे होऊ शकतात, हेच यातून सिद्ध होते.
-सुरेखा वैद्य, रहिवासी
आता हे मैदान खूप चांगले झाले आहे. यामुळे आमच्या घरातील बोअरची पाणीपातळी वाढली. आता हे सौंदर्य अबाधित ठेवणे आम्हा सर्वांची जबाबदारी आहे, तरच त्यांच्या प्रयत्नांना ख-या अर्थाने यश मिळाले, असे म्हणता येईल.
-मोहन चोपडेकर, नागरिक
पाण्याचा योग्य वापर
पावसाळा सुरू होण्यापूर्वी गाळ अंथरण्याचे काम पूर्ण झाले होते. आता यावर लॉन लावण्याचे ठरले. मात्र, लॉन जगवायचे असेल, तर त्यासाठी पाणी आवश्यक होते. बोअर घेतला; पण त्याला पाणी लागले नाही. योजनेवर पाणी फेरण्याची शक्यता दिसत असतानाच पुन्हा तज्ज्ञांचा सल्ला उपयुक्त ठरला. त्यांनी भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी पुढील उपाय सुचवले.
> उन्हाळ्यातच रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी दोन्ही बाजूंनी 8 फुटांचे गड्डे खोदले.
> पावसाळ्यात वाहून जाणारे सर्व पाणी नाल्या काढून या गड्ड्यात सोडण्यात आले.
> घरातून धुणे-भांडी, नळाचे बाहेर पडणारे पाणीही खास नाल्या करून या गड्ड्यात पोहोचवण्यात आले.
> हे उपाय केल्यामुळे पावसाळा सुरू होण्याआधीच बोअरला पाणी आले.
नयनरम्य हिरवळ
एक-एक प्रश्न सुटत होते. वॉचमन आल्यामुळे आता पुढचे पाऊल उचलणे शक्य होते. 7 लाख रुपये खर्चून गार्डनिंगचे कंत्राट देण्यात आले. गार्डनरने यावर 200 ट्रक काळी माती टाकली. यामुळे खडकाळ मैदानाला काळ्या मातीच्या मैदानाचे रूप मिळाले. मैदान भरून लॉन आणि विविध फुलांची झाडे लावण्यात आली. पावसाळ्यात लॉन आणि फुलझाडे बहरली. बघता-बघता या खडकाळ माळरानावर नंदनवन तयार झाले.
वॉर्डाची गरज होती
वॉर्डातील हे उद्यान खडकाळ जमिनीमुळे ओसाड पडून होते. येथे टवाळखोर लोक गोंधळ घालायचे. त्यामुळे लोकांना त्रास व्हायचा. ही बाब लक्षात घेऊन मी याचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला. दीड वर्ष हे काम चालले. ही वॉर्डाची गरज होती. त्यात नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे आणि सकारात्मक भूमिका घेतल्याने हे काम पूर्ण झाले. आता याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी नागरिकांचीच आहे.
-किशारे नागरे, नगरसेवक, सुदर्शननगर, हडको, एन-11