आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Governmental Engineering Collage, Divya Marathi

शासकीय अभियांत्रिकीमध्ये मुलींना मिळते सापत्न वागणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्वी इंजिनिअरिंग शाखेला मुलींचा ओढा कमी असायचा. त्यामुळे मुलांचे वसतिगृह मोठे, तर मुलींचे खूप लहान अशी जुनी रचना या ठिकाणी आहे; पण गेल्या 10 वर्षांत मुलींनी शिक्षणासह सर्वच क्षेत्रांत आघाडी घेतली. त्याला अभियांत्रिकी क्षेत्रही अपवाद नाही. दरवर्षी इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्याची मुलींची संख्या वाढतच आहे. त्यांच्यासाठी खूप उशिरा सरकारने शासकीय वसतिगृह बांधायला घेतले, पण तीन वर्षे झाली तरी ते अजून अपूर्णच आहे. त्यामुळे 60 टक्के विद्यार्थिनींना कॅम्पसबाहेर राहावे लागत आहे. त्यांच्या अनेक समस्या आहेत. संध्याकाळी सात वाजेनंतर कुठल्याही कामासाठी घराबाहेर पडता येत नाही. शिवाय बाहेर एका रूममध्ये 7 ते 8 विद्यार्थिनी राहतात. रूम ते महाविद्यालय या रस्त्यावरून जाताना त्यांना असुरक्षित वाटते. तशा घटनाही घडलेल्या आहेत.


मुलांना चांगल्या सुविधा
सर्व पातळीवर तक्रारी मांडल्यानंतर अखेर काही विद्यार्थिनींनी डीबी स्टारकडे धाव घेतली व नाव प्रसिद्ध न करण्याच्या विनंतीवर त्यांनी आपली व्यथा मांडली. प्राचार्य ते शासकीय अधिकार्‍यांपर्यंत सगळ्यांना पत्रे पाठवली, पण काही उपयोग झाला नाही. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात 500 मुले राहू शकतील एवढे मोठे वसतिगृह आहे. मात्र, त्या तुलनेत मुलींचे वसतिगृह खूप छोटे आहे. तेथे फक्त 100 मुली राहू शकतात. आता तेथे चारशे ते सव्वाचारशे मुली शिकत आहेत. वसतिगृह लहान असल्याने महागड्या रूम घेऊन चार वर्षे राहावे लागते, असे या मुलींनी सांगितले.


मुलींना राहण्यासाठी तिप्पट खर्च
राज्याच्या कानाकोपर्‍यातून शिकायला येणार्‍या मुलींना येथे राहायला हॉस्टेल नाही, हेच माहिती नव्हते. कॉलेज कॅम्पसजवळ पीरबाजार, एकनाथनगर या भागातच मुलींना राहावे लागते. तेथे भाडेही खूप आहे. एका मुलीला दरमहा राहण्याचा व जेवणाचा 3 ते 4 हजार रुपये खर्च आहे. मात्र, सरकारी हॉस्टेलवर हा खर्च फक्त 600 रुपये महिना आहे. यावरून ही तफावत दिसते.


भव्य वसतिगृहाचे काम रखडले
याच परिसरात मुलांच्या जुन्या वसतिगृहाच्या बाजूलाच भव्य असे मुलींचे वसतिगृह होत आहे. हे बांधकाम सप्टेंबर 2011 मध्ये सुरू झाले. ते 24 महिन्यांत पूर्ण करण्याची हमी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली होती. 2013 अखेरीस ते पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अजून भरपूर काम बाकी आहे. साडेचार कोटी रुपये अशी अंदाजे रक्कम या इमारतीची आहे. देवगिरी इन्फ्रास्ट्रक्चरला हे काम शासनाने दिले आहे.


वसतिगृह लवकर व्हावे
मला मुलींची समस्या माहिती आहे. कारण त्या वारंवार माझ्याकडे हा विषय घेऊन येतात; पण हे काम आमच्या अखत्यारीत नाही. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ही जबाबदारी आहे. मी स्वत: अनेक स्मरणपत्रे त्या विभागाला पाठवली आहेत. हे वसतिगृह लवकर व्हावे अशी माझी मागणी आहे.
प्रा. पी. के. अडवाणी,प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय.


या आहेत नेमक्या समस्या
सरकारी वसतिगृहाचे भाडे फक्त 600 रुपये, तर बाहेरील रूमचे भाडे 3000 आहे.
> महाविद्यालयाची फी वर्षाला 38 हजार ते 48 हजार एवढी आहे. यात पुस्तकांचा खर्च वेगळा व रूमचा खर्च वर्षाला 36 ते 40 हजारांवर जातो.
> बाहेर एका रूममध्ये सात विद्यार्थिनींना राहावे लागते. त्यामुळे अभ्यासाबरोबरच सगळ्या बाबींमध्ये त्रास होतो.
> कॉलेज ते रूम या भागात जाता-येता असुरक्षित वाटते.


पाठपुरावा करतोय
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्यामुळेच हे वसतिगृह औरंगाबादेत होत आहे. याचे टेंडर कॉल करून सार्वजनिक बांधकाम विभाग प्रक्रिया पूर्ण करते. ते पूर्ण होण्यास काय अडचण येत आहे, ते सार्वजनिक बांधकाम विभागच सांगू शकेल. आम्ही त्या कामाचा सारखा पाठपुरावा घेत आहोत.
प्रा. आर. एम. दमगीर, सिव्हिल विभाग


येत्या वर्षात काम होणार
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहाचे 90 टक्के काम झाले आहे. उरलेली सर्वच कामे लवकर पूर्ण करण्यासाठी मी पाठपुरावा करतो. त्यामुळे त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. येत्या शैक्षणिक वर्षात त्यांना तेथे राहायला जाता येईल.
राजेश टोपे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री