आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - यंदा मार्चच्या पंधरवड्यात वादळी वारा आणि गारपिटीसह 75 मिमी पाऊस कोसळला. उन्हाळ्य़ाच्या प्रारंभालाच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पाऊस पडल्याने गेल्या 25 वर्षांत नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. सलग दहा महिन्यांत 1005.5 मिमी पावसाचासुद्धा विक्रम मार्चमध्येच झाला आहे. गेल्या सात वर्षांत एवढा पाऊस पडल्याची हवामान खात्याकडे नोंद नाही. 2010 मध्ये 928 मिमी पाऊस पडल्याची नोंद तेवढी आढळते.
हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान अचानक वाढल्याने भारतीय उपखंडात चक्राकार वारे निर्माण झाले. या वार्यांनीच सामान्य हवामानाची पार ऐशीतैशी केली. अचानक वादळी वारा आणि गारपिटीचा मारा होऊ लागला. देशभर वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे अतोनात हानी झाली. औरंगाबाद जिल्ह्यातही अशीच स्थिती होती. गेल्या अनेक वर्षांत प्रथमच अशी बिकट स्थिती निर्माण झाल्याने ‘दिव्य मराठी’ने यंदा पर्जन्यमानाचा आढावा घेतला असता कधी नव्हे ते मार्चमध्ये वेगळा विक्रम रचल्याचे स्पष्ट झाले.
1989 मध्ये 48.6 मिमी पाऊस झाला होता. या पर्जन्यमानाचा विक्रम मार्च 2014 मध्ये मोडला गेला. 3 ते 12 मार्चपर्यंत 75 मिमी पाऊस कोसळल्याने नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.जून ते सप्टेंबरमध्ये 647 मिमी पाऊस कोसळला. त्यामुळे खरिपाची पिके चांगली आली. 2012 मध्ये पडलेल्या दुष्काळामुळे 250 ते 300 फूट खोल खालावलेली जलपातळी उंचावली. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात 260 मिमी पाऊस पडल्याने चार वर्षांत प्रथमच रब्बीची विक्रमी पेरणी झाली.
गव्हाच्या ओंब्या, ज्वारी व मक्याची कणसे, हरभर्याचे घाटे, आंब्याला मोहर, डाळिंब बहरून आले होते. मात्र बंगालचा उपसागर व अरबी समुद्रातील पाण्याचे वाढलेले तापमान आणि चक्राकार वारे यामुळे हवामानात बदल झाला. परिणामी जानेवारीत 9.6 मिमी पाऊस पडला. 26 फेब्रुवारीला प्रथम वादळी वारे, मेघगर्जना व गारपिटीसह अवकाळी (14.2) पाऊस झाला. 3 मार्च रोजी 26.6 मिमी, 9 मार्च रोजी 17.2 व 12 मार्च रोजी 26.6 मिमी पाऊस कोसळला. या पावसाने यंदाचा सर्वांच्याच लक्षात राहील असा विक्रम केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.