आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Holi Festivel, Divya Marathi

बोंबा मारून अन् रंग खेळून लुटला होलिकोत्सवाचा आनंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - फाल्गुन शुक्ल पक्ष पौर्णिमेच्या रविवारी शहरात ठिकठिकाणी होलिकेचे दहन करून होलिका महोत्सव साजरा करण्यात आला. घराघरांसमोर होळी पेटवून पारंपरिक पद्धतीने अग्नीचे पूजन करण्यात आले. संध्याकाळी सहा ते रात्री साडेआठपर्यंत होलिकादहनाचा मुहूर्त होता. सार्वजनिक होलिका महोत्सवात वर्षभरात घडलेल्या वाईट घटना आणि दुष्प्रवृत्तींचे दहन करण्यात आले. बोंबा मारून आणि एकमेकांवर रंगांची उधळण करून होलिकोत्सव साजरा करण्यात आला.


संस्थान गणपतीसमोरील होळीचे दहन खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते रात्री आठ वाजता झाले. या वेळी आमदार प्रदीप जैस्वाल, पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नंदू घोडेले, राजाबाजार मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष मनोज पराती, संजय चिंचलाणी, दयाराम बसैये, पोलिस उपायुक्त डॉ. जयकुमार जाधव यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. तर औरंगपुरा चौकात क्षितिज संघटनेकडून वर्षभरात घडलेल्या वाईट घटना आणि दुष्प्रवृत्तींचे फलक टांगून होळी पेटवण्यात आली. असत्य, अतिवृष्टी, गारपीट, दहशतवाद, चिनी आक्रमण, भेदभाव, पाणीटंचाई, निरक्षरता, शहरातील खड्डे, रोगराई, दुराचार आदी फलक लावण्यात आले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष किशोर जांगडे, लक्ष्मीनारायण चितलांगे, जगन्नाथ दळवी आदींची उपस्थिती होती. टीव्ही सेंटर, सिडको, उस्मानपुरा, हसरूल, मुकुंदवाडी, चिकलठाणा या परिसरात पारंपरिक पद्धतीने होलिका महोत्सव साजरा करण्यात आला.


इको फ्रेंडली होळी
शहरातल्या अनेक मंडळांनी या वर्षी इको फ्रेंडली होळीसाठी पुढाकार घेतला होता. होळीत अधिक लाकडे न जाळता केवळ गोवर्‍या पेटवून होळी साजरी करण्यात आली. मद्याचे सेवन न करता धुळवड साजरी करण्याचा संकल्पही काही मंडळांनी केला. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ महाराष्ट्र संस्थेतर्फे चालणार्‍या अभिरुची वर्गात विद्यार्थ्यांना या निमित्ताने नैसर्गिक रंग बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.


यंदा आचारसंहितेमुळे मर्यादा
आचारसंहिता लागल्यामुळे राजकीय पक्षांना उघड-उघड प्रचार करता येत नाही. मात्र निवडणुका जवळ आल्यामुळे नेत्यांच्या पुढाकाराने कार्यकर्त्यांची होळी आणि रंगपंचमी जोरात असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शहरातल्या अनेक मंडळांच्या होलिका महोत्सवात पूजा केली. अनेक ठिकाणी डीजेच्या तालावर नाचत तरुणांनी आनंद व्यक्त केला. औरंगपुरा, गुलमंडी, मछली खडक, टीव्ही सेंटर भागात पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.