आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Industralist,cheque Bounce

उद्योजकांनी कर स्वरूपात दिलेले धनादेश चक्क बाउन्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज महानगरीत उद्योजकांनी कर थकवल्याचे वृत्त डीबी स्टारने प्रसिद्ध केले. मालमत्ता करावरून उद्योजक आणि ग्रामपंचायतीचा वाद सुरू असतानाच दुसरीकडे काही बड्या उद्योजकांनी कर स्वरूपात दिलेले धनादेश चक्क बाउन्स झाले आहेत. विशेष म्हणजे काही धनादेश एकदा नव्हे तर चक्क तीनदा बाउन्स झाल्याचा प्रकार डीबी स्टारच्या तपासात उघड झाला आहे. ग्रामपंचायत कर्मचारी करवसुली करताना दादागिरी करत आहेत. शिवाय रक्कम भरल्यानंतर पुन्हा चेक टाकून त्रास दिला जात असल्याचे उद्योजकांनी स्पष्ट केले आहे.


प्रतिवर्षी 1 हजार 350 लहान-मोठ्या उद्योजकांच्या माध्यमातून जोगेश्वरी ग्रामपंचायत, रांजणगाव ग्रामपंचायत, वडगाव कोल्हाटी, बजाजनगर ग्रामपंचायतीसह इतर छोट्या पंचायतींच्या हद्दीत येतात. रांजणगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणा-या 104 उद्योजकांनी वर्षानुवर्षे कर थकवला आहे, तर काही नामवंत उद्योजकांनी दिलेले धनादेश बाउन्स झाले आहेत. याविरुद्ध सातत्याने समज देऊनही 6 उद्योजक कर भरण्यास विरोध करत आहेत. त्यांच्याविरोधात खटले दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.


या आहेत ‘त्या’ 6 कंपन्या
कंपनीचे नाव रक्कम तारीख
लीला सन्स इंड्रस्टीज 5 लाख 66508 11 जानेवारी 14
महाराष्‍ट्र पॅरिसाइड 4 लाख 310 8 15 जानेवारी 14
(11 लाख बाकी)
सचिन इंजिनिअरिंग 41,204 7 जानेवारी 2014
राजधारी टूल्स प्रा. लि. 19,119 7 जानेवारी 2014
कनिक्स इंटरप्रायजेस 61, 705 11 जानेवारी 2014
इमेज गारमेंट्स 51, 105 11 जानेवारी 2014


घोळात घोळ
उद्योजक धनादेशाने कर भरतात, मात्र ते वटत नसल्याने ग्रामपंचायत रोख रक्कम मागते. याचा फायदा घेत उद्योजक खंडणीचा गुन्हा दाखल करत असल्याचा सरपंचांचा आरोप आहे. करवसुलीच्या नावावर दादागिरी वाढल्याचा आरोप होतो. ग्रामपंचायतीने रोख रक्कम घेण्यापेक्षा चेक बाउन्स करणा-यांवर कायदेशीर कारवाई करणे योग्य पर्याय ठरू शकतो. पंचायतीवरील आरोप गंभीर आहेत. त्यामुळे व्यवहारात पारदर्शकता आणणे आवश्यक आहे.


कारवाई कधी?
उद्योजक कर भरत नसल्याचा कांगावा करत असतानाच ग्रामपंचायत कारवाई करण्यास धजावत नाही. दुसरीकडे ग्रामपंचायत सदस्य खंडणी मागत असल्याचा उद्योजकांचा आरोप आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने पारदर्शक कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्या भूमिकेवरून संशय निर्माण होऊ शकतो.
थेट सवाल कांताबाई जाधव, सरपंच, रांजणगाव


किती उद्योजकांचे धनादेश बाउन्स झाले?
- सध्या आमच्या रेकॉर्डवर 6 उद्योजकांनी दिलेले लाखांचे चेक बाउन्स झाल्याची नोंद आहे. उद्योजकांना प्रत्येक वेळी करात सवलत हवी असते, परंतु ती आम्ही देऊ शकत नाही. त्यामुळेच ते कर भरण्यास टाळाटाळ करतात.
या प्रकरणी आपण काय कारवाई केली ?
-आम्ही उद्योजकांना एकदा चेक बाउन्स झाल्यानंतर त्याबाबत कळवले आणि दुस-यांदा धनादेश बँकेत टाकला, तरीही दोन वेळा पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरुद्ध न्यायालयात नियम 138 प्रमाणे खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
धनादेश बाउन्स होऊ देण्यामागे उद्योजकांचा काय हेतू असावा, असे आपणास वाटते?
-आम्ही जेव्हा जप्तीची कारवाई करण्यासाठी जातो तेव्हा कारवाई टाळण्यासाठी ते आम्हाला धनादेश देतात. वेळ मारून नेण्यासाठीच ते असे करतात, असा आमचा अनुभव आहे.
रोख पैशात अफरातफर होत असल्याचा आरोप असल्याने आम्ही धनादेश देतो, असे काहींचे म्हणणे आहे...
-हा आरोप साफ खोटा आहे. आजपर्यंत आमच्याकडे अशी कुठलीही घटना ग्रामपंचायतीत घडलेली नाही. उलट आमच्यावरच एका उद्योजकाने खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
काय म्हणतात ग्रामपंचायत सदस्य?
उद्योजक कारवाई करायला गेले की, कर चेकने भरतात. नंतर मात्र तो बाउन्स होतो. हा आमच्यासोबत धोका आहे. त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करू.
-सुभाष गोरे
कोट्यवधींची उलाढाल करतात. बाजारात त्यांचे नाव आहे. परंतु ही मंडळी आमच्यासोबत एक प्रकारची फसवेगिरीच करत आहेत.
-दत्तू हिवाळे
यापुढे आम्ही उद्योजकांना कर हा रोख पैशाच्या स्वरूपात भरावा, अशी सूचना करणार आहोत. वेळ पडल्यास तसा ठराव ग्रामसभेत घेतला जाईल.
--गोरखनाथ हिवाळे
थेट सवाल सुनील भोसले, अध्यक्ष, मसिआ
उद्योजकांनी कराच्या स्वरूपात दिलेले धनादेश बाउन्स होत आहेत...
-याबाबत मला निश्चित सांगता येत नाही.
याबाबत तुमचे काय म्हणणे आहे?
-निश्चितपणे उद्योजकांना जास्त कर आकारला जात आहे. याबाबत आमचा लढा सुरू आहे, परंतु जर एखाद्या उद्योजकाने कराचा धनादेश दिला असल्यास तो बाउन्स होण्याचे कारण नाही. जर त्यांना कराची रक्कम मंजूर नव्हती तर त्यांनी विरोध करायला हवा होता. चेक बाउन्स होणे हे कायद्याला धरून नाही. तसे व्हायला नको आहे. तरीही याबाबत मी अधिक बोलू शकत नाही.


काय म्हणतात उद्योजक ?
ते दादागिरी करीत होते
वास्तविक इमेज गारमेंटकडून आम्ही नीळकंठ प्लास्टिक नावाने कंपनी विकत घेतली आहे. अचानक आमच्याकडे 30 ते 35 लोक आले. त्यांनी करवसुलीचा तगादा लावला. आम्ही त्यांना विचारण केली. मात्र, आमचा 2 टन माल त्यांनी ट्रॅक्टरमध्ये भरला. म्हणून आम्ही त्यांना 51 हजारांचा धनादेश दिला. नियमाने आमचा कर हा 17 हजारांपर्यंतच होता. आम्ही बँकेतून स्टॉप पेमेंट केले आणि कर भरून पावती घेतली आहे. तूर्तास वेळ काढण्यासाठी आम्हाला धनादेश द्यावा लागला.
रितेश अग्रवाल, नीळकंठ प्लास्टिक


आम्ही भाडेकरू आहोत
कनिस इंटरप्राइजेसचे मालक गिरीश पवार हे मुंबईला असतात. ग्रामपंचायतीचे लोक आले आणि त्यांनी कराचे पैसे मागायला सुरुवात केली. आम्ही पवारांना फोन करून सांगितले. त्यांनी आम्हाला तुम्ही पेमेंट करा, मी आल्यावर तुम्हाला पैसे देतो, असे सांगितले. त्यामुळे आम्ही धनादेश दिला. नंतर पवार यांनी स्वत: ग्रामपंचायतीला कर भरून पावती घेतली आहे. आम्ही आमचा धनादेश परत करावा, अशी मागणी केली आहे. -प्रवीण जगताप (भाडेकरू, कनिस इंटरप्रायजेस)


ग्रामपंचायतीची कारवाई अयोग्य
लीला सन्स कंपनीने कर न भरल्याने ग्रामपंचायतीने कंपनीवर कारवाई करून सुमारे 8 ते 9 लाखांचा माल जप्त केला होता. तेव्हा कंपनीच्या वतीने 5 लाखांचा धनादेश ग्रामपंचायतीला दिला. परंतु ग्रामपंचायतीने केलेली कारवाई अयोग्य असल्याचे कंपनीच्या वकिलांचे म्हणणे होते. कर भरला नसल्याने कंपनीवर जप्तीऐवजी सील ठोकण्याची कारवाई करण्याचा नियम आहे. नियम तोडल्याचे लक्षात आल्याने कंपनीने ग्रामपंचायतीला दिलेला धनादेश अडवला, असे कंपनीच्या प्रशासनाचे म्हणणे आहे. ग्रामपंचायतीने चुकीची कारवाई केल्याचा आरोपही कंपनीने केला आहे. नाव न छापण्याच्या विनंतीवर ही माहिती अधिका-यांनी दिली.