आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Lok Sabha Election 2014

निवडणुकीची रणधुमाळी: इच्छुकांवर नव्हे, हाणामारी करणार्‍यांवरच कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लोकसभेसाठी कोणाला उमेदवारी द्यावी हे जाणून घेण्यासाठी गांधी भवनात दाखल झालेल्या निरीक्षकांसमोर तुंबळ हाणामारीची शनिवारची घटना काँग्रेसच्या श्रेष्ठींनी ‘सहज’ घेतल्याचे समोर आले आहे. इच्छुक उमेदवारांच्या सांगण्यावरून हा प्रकार झालेला नसेल तर वाद घालणार्‍यांविरुद्ध सक्त कारवाई होईल, असे प्रदेश सरचिटणीस अरुण मुगदिया यांनी सोमवारी (24 फेब्रुवारी) स्पष्ट केले, तर ही हाणामारी श्रेष्ठींच्या कोर्टात असल्यामुळे बोलणार नाही, असे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी सांगितले.


मुजफ्फर हुसेन आणि धोंडीराम राठोड या पक्षनिरीक्षकांसमोर शनिवारी दुपारी गांधी भवनात माजी खासदार उत्तमसिंह पवार आणि माजी आमदार नितीन पाटील यांचे कट्टर सर्मथक एकमेकांवर अक्षरश: तुटून पडले होते. यात एकाला दुखापत होऊन रक्तही सांडले. प्रसिद्धिमाध्यमांच्या कॅमेर्‍यासमोर झालेला हा प्रकार अख्ख्या महाराष्ट्राने बघितला. या प्रकरणी सोमवारी सायंकाळपर्यंत पोलिसात तक्रारही झाली नव्हती. या प्रकरणी श्रेष्ठींकडून कारवाई केली जाते की नाही, याची चर्चा पक्षात होती. मात्र प्रत्यक्षात अजून तसे काहीही झाले नसल्याचे समोर आले. त्याबद्दल विचारणा केली असता उमेदवारीसाठी भांडणे काँग्रेसमध्ये नेहमीच होतात. त्यामुळे श्रेष्ठींसाठी ही सहज घटना आहे, असा सूरही लावण्यात आला.


स्थानिक घडामोडींची वस्तुनिष्ठ माहिती श्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मुगदियांवर आहे. तेदेखील या घटनेचे साक्षीदार होते. त्यांच्यावर अकोल्यातील निरीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तेथील काम आटोपून परतल्यावर या प्रकरणाचा विचार केला जाणार असून मुजफ्फर हुसेन हा प्रकार श्रेष्ठींच्या कानी घालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


कारवाई काय होणार, अशी विचारणा केली असता जे भांडले त्यांच्यावर कारवाई करावीच लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र ज्या उमेदवारासाठी हे कार्यकर्ते भांडले, त्यांचे काय, अशा प्रश्न उपस्थित केला असता त्यांचा सहभाग दिसून आला तर नक्की विचार होईल. हाणामारी करून काँग्रेसची प्रतिमा मलिन करणार्‍यांविरुद्ध कारवाई नक्की होईल, असे स्पष्ट करताना कारवाई स्वरूप आणि ती कधी होईल, हे आताच सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.