औरंगाबाद - जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी काँग्रेसचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांच्या मुलाला जाहीर झाली. मात्र, औरंगाबादच्या उमेदवार निश्चितीचे भिजत घोंगडे कायम आहे. माजी खासदार उत्तमसिंह पवार, माजी आमदार नितीन पाटील ही इच्छुक मंडळी दोन दिवसांच्या दिल्ली मुक्कामावरून शनिवारी शहरात परतली.
शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा तसेच फुलंब्रीचे आमदार डॉ. कल्याण काळे यांना लोकसभेची उमेदवारी नको असतानाही त्यांची मनधरणी करण्यात येत आहे. दुसरीकडे पवार, पाटील यांना मात्र ताटकळत ठेवण्यात येत आहे. शिवसेनेचा प्रचार सुरू झाला असला तरी काँग्रेसमध्ये उमेदवाराच्या नावाचा शिमगाच सुरू आहे. पुढील आठवड्यात उमेदवार पक्का होणार असा दावा केला जातो. काँग्रेसचा आतापर्यंतचा प्रवास लक्षात घेता 5 एप्रिलपर्यंत उमेदवार जाहीर होणार नाही, असाही दावा काही कार्यकर्ते करताना दिसतात.
एकूणच शिमग्यानंतरच म्हणजेच बुधवारनंतर उमेदवार ठरेल, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत. जालन्याचा उमेदवार नक्की झाल्यामुळे दुसर्याच दिवशी औरंगाबादचा उमेदवारही ठरेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. पवार आणि पाटील या दोघांनीही त्यासाठी दिल्ली जवळ केली होती. श्रेष्ठींच्या तोंडी आधीपासूनच दर्डा यांचे नाव असल्याचे समजते. त्यांच्या नकारानंतर डॉ. काळे यांना यंदा औरंगाबादेतून खासदार करावे असा एक मतप्रवाह पुढे आला. यामागे जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात असल्याचे सांगण्यात येते. दर्डा यांना स्वत:साठी उमेदवारी नको असली तरी उमेदवार मात्र मजिर्तीलच हवा आहे.
काँग्रेस की राष्ट्रवादी
काँग्रेसने उमेदवारीचे भिजत घोंगडे ठेवल्याने औरंगाबादची जागा राष्ट्रवादीसाठी सोडली जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास राष्ट्रवादीकडून आमदार सतीश चव्हाण, सुधाकर सोनवणे किंवा भाऊसाहेब चिकटगावकर यांच्यातून निवड केली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली.