आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Mahashivratra Special

महाशिवरात्री विशेष: सत्येश्वर महादेवावर ‘कृपादृष्टी’ची गरज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मात भगवान शंकर आणि देवी पार्वती या जोडीला आदर्श मानले जाते. प्रत्येक मंदिरात शिव-पार्वती शेजारी-शेजारी असतात; पण जुना भावसिंगपुरा येथील श्री सत्येश्वर शिवपार्वती मंदिरात ते समोरासमोर, वेगवेगळ्या ठिकाणी विराजमान आहेत. 400 वर्षे जुने हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असले तरी याकडे पालिका, पुरातत्त्व खाते आणि अन्य कुठल्याही शासकीय खात्याने लक्ष दिलेले नाही.


शहरात महादेवाची अनेक मंदिरे आहेत. त्यात जुन्या भावसिंगपु-यातील श्री सत्येश्वर शिवपार्वती मंदिर वेगळेपण जपून आहे. शहरापासून दूर दर्शनासोबतच निसर्गरम्य वातावरणात काही क्षण घालवण्यासाठी हे उत्कृष्ट ठिकाण ठरू शकते.


मंदिराला 400 वर्षांचा इतिहास
सत्येश्वर महादेव मंदिराला 400 वर्षांचा इतिहास आहे. निझामाच्या सैन्यातील सरदार भावसिंग यांच्याकडे हा भाग होता. त्यांच्या नावावरूनच या परिसराचे नाव भावसिंगपुरा पडले. त्यांनी सैनिकांची छावणी उभारली होती. त्यांना दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी त्यांनी या मंदिराची उभारणी केल्याचे नागरिक सांगतात, तर काही लोक हे मंदिर त्यापेक्षाही जुने असल्याचे सांगतात.


असे आहे मंदिर
या मंदिरात महादेवाच्या अगदी विरुद्ध दिशेला पार्वती देवी उभी आहे. देशभरात दोन वा फार तर तीन मंदिरांतच शिव-पार्वती वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचे ग्रामस्थ सांगतात. मंदिराचा परिसर निसर्गरम्य आहे. श्रावणात तर हे सौंदर्य अधिकच बहरते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर 20-25 पाय-या आहेत. त्या उतरल्यावर शिव आणि पार्वतीची समोरासमोर मंदिरे आहेत. पूर्वीच्या महादेवाच्या दगडी पिंडीवर भाविकांनी पंचधातूंचे आवरण चढवले आहे. आणखी पुढे येथे 30 फूट खोल आणि 50 फूट रुंद अशी एक बारव आहे. या बारवेच्या एका बाजूने सुमारे 50 फूट उंच भिंत आहे. या भिंतीवर हत्ती मोट खेचून आडातून पाणी काढायचे. या पाण्याने परिसरातील नागरिकांची तहान भागायची, असे भाविक सांगतात. आडाच्या भिंतीवरच हनुमानाची छोटी मूर्ती आहे.


देशपांडे आजींची समाधी
या भागात राहणा-या ताराबाई देशपांडे यांनी तब्बल 50 वर्षे नित्यनियमाने या मंदिरात सेवा केली. त्या दररोज मातीची 108 शिवलिंगे तयार करून ती इथल्या विहिरीत विसर्जित करायच्या. त्या मंदिरात पूजाअर्चा करायच्या. त्यांची समाधी या मंदिराच्या परिसरातच आहे.


ऐतिहासिक ठेव्याची पडझड
गुलाबी तटबंदी नामशेष
पूर्वी मंदिराच्या 4 ते 5 एकराच्या परिसराला गुलाबी भिंतीची तटबंदी होती. 4 दरवाजांतून आत प्रवेश मिळत असे; पण आता ही तटबंदी नामशेष झाली आहे. एकच दरवाजा मंदिराच्या समृद्धीची साक्ष देत डौलात उभा आहे.


अष्टविनायक मंदिराचीही दुरवस्था
महादेव मंदिराजवळच अष्टकोनी छत्री असून तेथे अष्टविनायकाचे मंदिर आहे. या मंदिराची अवस्थाही खराब झाली आहे. काही दानशूर भक्तांच्या सहकार्याने मंदिरात फरशी, मजबूत पाय-या बसवण्यात आल्या आहेत; पण मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पक्का रस्ता नाही. पावसाळ्यात तर अक्षरश: चिखलातून तुडवत येथे पोहोचावे लागते. मंदिराच्या परिसरात सुरक्षा व्यवस्थाही नाही.


शासनाचा ताबा नाही
इतिहासतज्ज्ञ दिवंगत डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांनीही हे मंदिर खूप प्राचीन काळातील असण्याची शक्यता व्यक्त करतानाच मंदिरावर सखोल संशोधनाची गरज असल्याचे म्हटले होते. 400 वर्षांचा इतिहास जरी गृहीत धरला तरी मंदिराचा ताबा राज्य किंवा केंद्रीय पुरातत्त्व खात्याने घ्यायला हवा होता; परंतु हे मंदिर दोन्हींपैकी कोणाच्याच ताब्यात नाही. यामुळे ते दुर्लक्षित राहिले. यावर संशोधन होऊ शकलेले नाही.


थाटात होतो विवाह
महाशिवरात्रीला मंदिराची आकर्षक सजावट केली जाते. दिवसभर ओम नम:शिवायचा जप चालतो, तर रात्री 12 वाजता महादेव-पार्वतीचा थाटात विवाह लावला जातो. दोन्ही बाजूचे वराती येथे येतात. ख-या विवाहासारखाच हा विवाह संपन्न होतो.


हे शहराचे वैभव
मी लहानपणापासून या मंदिरात येत आहे. इथले माहात्म्य मी स्वत: अनुभवले आहे. शिव-पार्वती वेगळे उभे असणारे हे मोजक्या मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर आपल्या ऐतिहासिक शहराच्या वैभवात भर घालणारे असून येथे भाविकांसाठी अधिकाधिक सुविधा निर्माण व्हायला हव्यात.
- विक्रम पाटील, भाविक


सुविधा देण्याचा प्रयत्न
या ठिकाणी भाविकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या मंदिराबाबत आणखी संशोधन होऊन व्हावे. शिवाय शासकीय स्तरावरून मदतही व्हावी.
केशवराव लोखंडे, पुजारी