आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Marathwada, Divya Marathi

मराठवाडा लागला कामाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने डीबी स्टारमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यापासून ते आजपर्यंत जवळपास सर्वच उपविभागांच्या को-या नोंदवह्या अद्ययावत करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे गेल्या 10 वर्षांपासून थांबलेल्या कामास अखेर प्रारंभ झाला आहे. यासोबतच संपूर्ण मराठवाडा विभागातील जिल्हा परिषदांनीही नोंदवह्या अद्ययावत करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत डीबी स्टारने ‘बांधकामच्या नोंदवह्या को-याच’ या मथळ्याखाली 5 ऑगस्ट 2013 रोजी वृत्त प्रकाशित केले होते.

शासनाच्या अकाउंट कोडनुसार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने मंजूर व सुरू झालेल्या सर्व बांधकामांच्या प्रगतीबाबत नमुना नंबर 23 नोंदवही अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ही बांधकामे पूर्ण झाल्यावर त्याच्या नोंदी नमुना नंबर 69 मध्ये ठेवणे बंधनकारक आहे. ही नोंदवही अद्ययावत ठेवली नाही तर कामे कोणती आहेत, त्या कामांना प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता आहे किंवा नाही आणि अंदाजपत्रकीय रक्कम यांचा मेळ लागत नाही आणि भ्रष्टाचाराला खतपाणी मिळते. नोंदवह्या अपडेट ठेवल्यास शासकीय मालमत्ता किती आणि कुठे आहे, हे स्पष्ट दिसून येते आणि त्यावर अतिक्रमणही होत नाही. मात्र, जि. प. बांधकाम विभागाने 2006 पासून बांधकामाशी संबंधित अशा कोणत्याच नोंदवह्या अद्ययावत केल्या नसल्याचे डीबी स्टारने उघड केले. त्यानंतर त्याचा पाठपुरावाही केला. परिणामी जिल्हा परिषेअंतर्गत येणा-या सर्व उपविभागांनी नोंदवह्या अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. विशेष म्हणजे विभागीय आयुक्तांनी औरंगाबादसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांनाही नोंदवह्या अपडेट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग कामाला लागला आहे.

477 कामांची झाली नोंद
जि. प. बांधकाम विभागाचे चारही उपविभाग नोंदवह्या अपडेट करत आहेत. कन्नड आणि औरंगाबाद या उपविभागांनी आतापर्यंत 477 बांधकामांची नोंद नमुना नंबर 69 मध्ये घेतली आहे. कन्नड उपविभागाने कन्नड आणि खुलताबाद तालुक्यातील 2009 ते 2013 या कालावधीतील 316 कामांच्या नोंदी घेतल्या आहेत. औरंगाबाद उपविभागाने 2012-13 मधील 161 कामांच्या नोंदी घेतल्या आहेत. सिल्लोड आणि वैजापूर उपविभागातर्फे या नोंदवह्या अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

डीबी स्टारमुळे शक्य
जि.प. बांधकाम विभागाअंतर्गत सर्व उपविभागांनी नोंदवह्या अद्ययावत केल्या आहेत. एवढेच नाही, तर मराठवाड्यातील उर्वरित सर्व जिल्हा परिषदांनीदेखील नोंदवह्या अपडेट करण्याच्या कामास सुरुवात केली आहे. डीबी स्टारने केलेल्या पाठपुराव्यामुळेच हे सर्व शक्य झाले आहे.
-सुरेश बेदमुथा, विभागीय उपायुक्त (विकास शाखा)

पत्रव्यवहार करून थकलो
आम्ही संबंधित उपविभाग आणि पंचायत समित्यांना पत्रव्यवहार करून थकलो होतो. गेल्या चार वर्षांपासून आमचा पाठपुरावा सुरू आहे, पण हे लोक सातत्याने टाळाटाळ करत आले आहेत. आता विभागीय आयुक्त आणि डीबी स्टारने केलेल्या पाठपुराव्यामुळे यंत्रणा कामाला लागली आहे.
-एस. जी. जाधव, मुख्य आरेखक, जि. प. बांधकाम विभाग