आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - अभिजात भारतीय नृत्य संगीताची भुरळ संपूर्ण विश्वाला आहे. महागामी गुरुकु लात अनेक परदेशी विद्यार्थी नृत्यसाधना करतात. गेल्या 3 महिन्यांपासून मेक्सिकोतून महागामीत कथ्थक नृत्यसाधना करणार्या आसुसिना हिने रविवारी विलोभनीय नृत्याचे सादरीकरण करत स्वत:चा प्रवास मांडला.
आसुसिना मुळात बॅले डान्सर; पण भारतीय नृत्यकलांचे सौंदर्य तिला आकर्षित करून गेले. तीन महिन्यांच्या व्हिसावर भारतात वास्तव्याची आणि नृत्यसाधना करण्याची संधी तिला उपलब्ध झाली. भारतीय खाद्यसंस्कृती, राहणीमान आत्मसात करतानाच यामागील शास्त्रही समजावून घेण्याचा ती प्रयत्न करत होती. नृत्याची भाषा, शिकण्यासाठीही तिने कठीण परिश्रम घेतले. कारण स्पॅनिश बोलणार्या आसुसिनाला इंग्रजी फारशी येत नव्हती, तेव्हा हिंदी-संस्कृतमध्ये असलेले नृत्याचे बोल समजावून घेणे तिच्यासाठी साधे नव्हते; पण हिंदी-संस्कृतचे इंग्रजी रूपांतर समजावून घेत त्याला स्पॅनिशमध्ये आत्मसात करण्याचे तिचे कौशल्य आज तिने प्रस्तुत केलेल्या नृत्य सादरीकरणातून दिसून आले.
‘कस्तुरी तिलकम’ या कृष्णस्तुतीने तिने सादरीकरणाची सुरुवात केली. मिर्श हंसध्वनी रागात बांधलेल्या या बंदिशीतून कृष्णाची वंदना तिने केली. श्रवणीय बोल आणि विलोभनीय पदन्यासातून तिने सर्वांचे लक्ष वेधले. कथ्थकच्या परंपरेत तिने तुकडे, तिहाई, लडी अशा कथ्थक नृत्याच्या विविध लकबी सादर केल्या. या वेळी गुरू पार्वती दत्ता यांनी दिलेल्या नृत्य प्रशिक्षणातील विविध अनुभव तिने सर्वांजवळ मनमोकळेपणाने व्यक्त केले. प्रशिक्षणासाठी आल्यावर पहिल्या दिवशीच्या आणि इतर विद्यार्थिनींसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा देत तिने वातावरण भावुक केले.
आज तिने केलेल्या नृत्य सादरीकरणासाठी राधिका शेलार हिने गायनाची, श्रीकांत गोसावी यांनी संवादिनीची, तर अमोल दिशागज यांनी तबल्याची साथ केली. या वेळी संजीव शेलार यांची उपस्थिती होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.