आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे कार्यकर्त्यांचा शोध पोलिसांकडून चालूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - टोलनाका आंदोलनादरम्यान शहर बसची तोडफोड करणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. त्यातील चार कायकर्ते मनविसेचे मराठवाडा संपर्क अध्यक्ष राजेश येरुणकर यांना सिडकोतील हॉटेल सोनिया येथे भेटण्यासाठी येणार असल्याची खबर पोलिसांना पक्षाच्याच काही कार्यकर्त्यांनी दिली. त्यानुसार त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी हॉटेलला दीड तास वेढा दिला. परंतु मनसेच्या एका पदाधिकार्‍याने कार्यकर्त्यांना लवकरच हजर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पोलिस परतले.


मनविसेतर्फे शहरात लेझीम स्पध्रेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी येरुणकर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर ते हॉटेल सोनियामध्ये गेले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांची चर्चा सुरू असताना सिडको पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गोरख चव्हाण, इतर कर्मचारी फरार कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी आले. पोलिस पथकाने हॉटेलच्या सर्व खोल्या आणि आसपासचा परिसरही पिंजून काढला. तथापि फरार कार्यकर्ते सापडले नाहीत. शेवटी त्यांनी खुद्द येरुणकर यांनाच कार्यकर्त्यांविषयी विचारले. त्यांनी कार्यकर्ते भेटले नसल्याचे सांगितले आणि त्यांना लवकरच हजर करू असे आश्वासनही दिले. पोलिसांना फरार कार्यकर्ते येणार असल्याची खबर नेमकी कोणी दिली याविषयी हॉटेल परिसरात उलटसुलट चर्चा सुरू होती.


या वेळी हॉटेलमध्ये नगरसेवक राज वानखेडे, सतनामसिंग गुलाटी, गणेश वानखेडे, संजोग बडवे आदींची उपस्थिती होती.


कार्यकर्त्यांना हजर करण्याचे आश्वासन
मनसेच्या नेत्यांना कार्यकर्ते भेटण्यास येतील, असा अंदाज होता. त्यानुसार सापळा रचला, पण यश आले नाही. आम्ही येरुणकर यांची भेट घेतली. त्यांना समजून सांगितले. त्यांनी लवकरच कार्यकर्ते हजर करू, असे आश्वासन दिले आहे. गोरख चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक, सिडको

हॉटेलमध्ये पोलिस आले होते. त्यांनी तपास केला. मात्र हवे असलेले कार्यकर्ते सापडले नसल्याने ते परत फिरले. - राजेश येरुणकर, मराठवाडा संपर्क अध्यक्ष, मनविसे.