आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Modi Should Be Apologise

'माफी मोदींनीच मागितली पाहिजे'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भारतीय जनता पक्षाने कितीही वेळा माफी मागितली तरी तो एक जातीयवादी पक्ष आहे, याची जाणीव देशातील मुस्लिम समाजाला आहे. त्यामुळे त्या पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी माफी मागितल्याचा काहीही उपयोग होणार नाही. शिवाय, ज्यांनी चुका केल्या त्या नरेंद्र मोदी यांनीच माफी मागितली पाहिजे, असे मत शहरातील राजकीय पक्षांच्या मुस्लिम पदाधिकार्‍यांनी बुधवारी व्यक्त केले. नवी दिल्लीत ‘मोदी फॉर मिशन 272 मध्ये मुस्लिमांची भूमिका’ या कार्यक्रमात राजनाथसिंह यांनी पक्षाच्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी माफी मागू, त्यात आम्हाला कमीपणा वाटत नाही, अशी भूमिका मांडली होती. त्यांच्या या विधानावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.


मुस्लिम जागा दाखवतील
ज्यांनी चुका केल्या, ते माफी मागत नाहीत, म्हणून पक्षाध्यक्षांवर माफी मागण्याची वेळ येते, ही भाजपसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. यांनी मुस्लिमांविरुद्ध काही चुका जरूर केल्या असतील. म्हणूनच माफी मागत आहेत. भाजपने हिंदुत्वाच्या मुद्दय़ाला बगल दिली आहे आणि आता आपण धर्मनिरपेक्ष आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न चालवला आहे. आगामी निवडणुकीत त्यांना माफ केले की नाही, हे मुस्लिम दाखवून देतील. अँड. सय्यद अक्रम, शहराध्यक्ष, काँग्रेस


भाजपचे मगरीचे अश्रू
भाजप मगरीचे अश्रू ढाळणारा पक्ष आहे. तो कधी स्वत:ला अज्ञानी, तर कधी साळसूद असल्याचे दाखवतो. निवडणुकीच्या वेळी तो रंग बदलतो. त्याचा खरा चेहरा जातीयवादी आहे आणि मुस्लिम कधीच अशा शक्तींना थारा देत नाहीत, हे त्यांनी लक्षात ठेवावे. कदीर मौलाना, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस


तेव्हा माफी का नाही मागितली ?
राजनाथसिंह आज माफी मागून काय सिद्ध करू इच्छितात ? त्यांनी स्वत:च्या मनाला विचारले पाहिजे की, मुस्लिमांनी त्यांना का माफ करावे? यापूर्वीही राजनाथ पक्षाध्यक्ष होते. त्या वेळी त्यांनी माफी का नाही मागितली? 12 वर्षांनंतर त्यांना ही जाणीव का झाली? की त्यांना मोदींची डागाळलेली प्रतिमा सुधारायची आहे? त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरणार आहे. कैसर कुरेशी, महाराष्ट्र प्रदेश संघटक, समाजवादी पार्टी

निवडणुकीमुळे उमाळा
माफी तर नरेंद्र मोदींनी मागितली पाहिजे, पण राजनाथसिंह का मागत आहेत? मोदींनी तर मुस्लिमांची टोपी घालण्यासही नकार दिला होता. लोकसभा निवडणुकांमुळे धर्मनिरपेक्षता दर्शवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. भाजप सरड्यासारखे रंग बदलणारा पक्ष आहे. मुस्लिम या पक्षाला मतदान करतील, असे वाटत नाही. जावेद कुरेशी, जिल्हाध्यक्ष, मजलीस-ए-इत्तेहादूल मुसलमीन