आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Opening, Divya Marathi

रस्ता अडवून दुकानाचे उद्घाटन पडले महागात!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मछली खडक येथील ‘प्रदीप बिकाना’ या मिठाई दुकानाच्या उद्घाटनासाठी रस्त्यावर विनापरवानगी मंडप उभारणे आणि ध्वनिक्षेपक वापरणे दुकान मालकाला चांगलेच महागात पडले. या दुकानाच्या उद्घाटनामुळे रविवारी (4 मे) सकाळी साडेदहा वाजता सिटी चौक ते गुलमंडी रस्त्यावरील वाहतुकीला तासभर अडथळा निर्माण झाला. त्यामुळे सिटी चौक पोलिस ठाण्यात दुकान मालक आणि साऊंड सिस्टिम देणारे मोहनराम चौधरी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुलमंडी, मछली खडक हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. रविवारी ‘प्रदीप बिकाना स्वीट्स अँड नमकीन’ हे दुकान सुरू करण्यात आले आहे. मुख्य बाजारपेठ असल्यामुळे दिवसभर येथे नागरिकांची वर्दळ असते. दुकान मालक प्रदीप बिकाना यांनी दुकानाच्या उद्घाटनासाठी ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ फेम दिलीप जोशी यांना निमंत्रित केले. निमंत्रणपत्रिकेवर त्यांच्यासह खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार प्रदीप जैस्वाल यांचीही नावे होती. उद्घाटनासाठी सर्व जय्यत तयारी केलेली असताना मालक बिकाना यांना मात्र पोलिसांची परवानगी घेणे अत्यंत क्षुल्लक बाब वाटली. अभिनेता जोशी, आमदार जैस्वाल आणि नगरसेवक अनिल मकरिये यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होत असल्यामुळे बिकाना यांनी कायदेशीर प्रक्रियेला फाटा दिला.

अभिनेते दिलीप जोशी यांच्या उपस्थितीमुळे सिटी चौक ते गुलमंडी या मार्गावर सकाळी सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. सर्वसामान्य वाहनधारकांना झालेल्या त्रासामुळे सिटी चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक नागनाथ कोडे यांनी साउंड सिस्टिमचे मालक मोहनराम चौधरी आणि मिठाई दुकानाचे मालक प्रदीप बिकाना यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त (14 एप्रिल) मुख्य मिरवणूक मार्गावर विना परवानगी स्टेज उभारणा-यांच्या विरोधातही कोडे यांनी गुन्हे दाखल केले होते. त्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचाही समावेश होता. त्यावेळी न्यायालयाच्या आदेशाने कोडे यांनी कार्यकर्त्यांची हर्सूल कारागृहात रवानगी केली होती.

परवानगीसाठी काय करावे : वाहतूक अडवून रस्त्यावर कार्यक्रम घेणे कायद्याचे उल्लंघन आहे. मंडप अथवा स्टेज उभारण्यासाठी मनपाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे संबंधित पोलिस ठाणे सार्वजनिक कार्यक्रमांसाठी परवानगी देते. विनापरवानगी ध्वनिक्षेपक वापरले, दोघांविरोधात कारवाई

दोषी आढळल्यास काय कारवाई होणार?
कलम स्वरूप शिक्षेची तरतूद
आयपीसी 341 रस्ता उडवून विनापरवानगी मंडप उभारणे 4 महिने ते 1 वर्षाचा कारावास
बीपी अ‍ॅक्ट 135 जमावबंदी आदेशाचे उल्लंघन 3 महिन्यांचा कारावास
ध्वनिप्रदूषण कायदा ध्वनिक्षेपकाचा गैरकायदेशीर वापर 3 महिने कारावास

अत्यंत नि:पक्ष आणि नियमाप्रमाणे कारवाई केली
आमदार आणि खासदार कार्यक्रमाला असले म्हणजे नियम पाळायचे नसतात हा चुकीचा समज आहे. कायदा सर्वांना समान असून आपण फक्त नियमाप्रमाणे कारवाई करत असतो. लोकप्रतिनिधींचा आदर आहे, पण त्यांनी कारवाईत कधीही हस्तक्षेप करू नये. मी अत्यंत नि:पक्ष आणि वेळप्रसंगी कठोर कारवाई करतो. त्यासाठी कुणाचाही मुलहिजा बाळगत नाही. कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही
नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक, सिटी चौक