आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Police Commissioner, Cidco, Divya Marathi

सात तोळे सोने जाऊ द्या, फक्त सौभाग्यलेणे परत करा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘आयुक्त साहेब, वर्षभरापूर्वी चोरट्यांनी घर फोडले अन् सात तोळे सोने पळवले. मी ठाण्यात नियमित पाठपुरावा करते, पण पोलिसांनी फाइलच बंद केली. साहेब, सात तोळय़ांचा ऐवज गेला तर गेला, पण माझे सौभाग्याचे लेणे परत करा अशी आर्त हाक सिडकोतील वर्षा भालेराव या गृहिणीने दिली. शनिवारी मुकुंदवाडी ठाण्यात पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत जनता दरबार झाला. महिलेची व्यथा ऐकताच आयुक्तांनी फाइल ओपन करून पुन्हा तपास करण्याचे आदेश पोलिस निरीक्षक जयकुमार चक्रे यांना दिले.
जवाहरनगर ठाण्यातील जनता दरबार पोलिस निरीक्षक हेमंत कदम आणि सहायक पोलिस निरीक्षक माजेद शेख यांनीच हाणून पाडल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने (2 मार्च) प्रसिद्ध केले होते. तक्रारकर्त्यांना पिटाळत दूरध्वनीद्वारे तीन राजकीय कार्यकर्त्यांचे बोलणे करून देत जनता दरबार यशस्वी झाल्याचा कदम यांचा बनाव ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणला होता. त्यानंतर पोलिस विभाग खडबडून जागे झाले असून मुकुंदवादी ठाण्यातील जनता दरबारात पोलिसांनी शंभरपेक्षा अधिक नागरिकांना सामावून घेतले. सर्वाधिक तक्रारी जमीन, फ्लॅट खरेदी-विक्रीशी संबंधित होत्या. तथापि, भूमाफियांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली. मात्र, सर्वात वेगळी तक्रार वर्षा भालेराव या सुशिक्षित गृहिणीने केली. वर्षभरापूर्वी भालेराव यांच्या घरातील 2 लाख 25 हजार रुपये किमतीचे सात तोळे सोने चोरट्यांनी लांबवले. मात्र, पोलिस निरीक्षक चक्रे यांनी या चोरीची फाइल बंद केली. ‘साहेब, ए फायनल काय असते..? मला माहिती नाही; पण चक्रे साहेब म्हणतात आता तपास करता येणार नाही आणि सोनेही परत मिळणार नाही.
साहेब, नकली मंगळसूत्र घालून कंटाळा आला असून इतर दागिने मिळाले नाही तरी चालेल; पण सौभाग्याचे लेणे मिळवून द्या.!’ अशी याचना या महिलेने डोळ्यांत पाणी आणून केल्यामुळे सिंह यांनी पुन्हा फाइल ओपन केली. सातारा ठाण्याच्या हद्दीतील महिला इंदुमती जाधव यांनी छळ करणार्‍या पतीला अटक करण्याची मागणी केली. मजुरीचे पैसे न देणार्‍या कंत्राटदारांवर कारवाई करून मजुरी मिळवून द्या, संसार मोडला पण नवर्‍याला अद्दल घडवा, अशा तक्रारी करण्यात आल्या. भाजपचे शहराध्यक्ष भगवान घडामोडे आणि मनपाचे स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांनी फौजदार महेश आंधळे यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली. सिंह यांनी मात्र तत्कालीन पोलिस आयुक्त संजयकुमार यांची कारवाई योग्य असल्याचे सांगत दोन महिने थांबण्याचा सल्ला दिला. प्रभाकर दाभाडे या तक्रारकर्त्याने एम. सिडको ठाण्याचे फौजदार के. एस. खोड पैशांची मागणी करतात, अशी तक्रार केली.
दोन पोलिस चौक्या सुरू करणार
संघर्षनगर, राजनगर येथील नागरिकांनी बंद पडलेली चौकी सुरू करण्याची मागणी केली. संघर्षनगर येथील चौकी लवकर सुरू होईल, मात्र राजनगर येथील चौकीला वेळ लागणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या आर्शयाने बारा अवैध दारूचे धंदे सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी केली. त्यावर आयुक्तांनी सलग दहा दिवस धाड टाकण्याचे आदेश चक्रे यांना दिले.