आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Rajendra Darda, Uttamsingh Pawar

निवडणुकीचा आखाडा: लोकसभेसाठी काँग्रेसमध्ये पवार, दर्डा यांच्यात चुरस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तमसिंह पवार - Divya Marathi
उत्तमसिंह पवार

औरंगाबाद - मध्यवर्ती बँकेच्या नोकरभरती घोटाळ्यात नाव, कन्नड येथील सभेत काँग्रेसचा उमेदवार पाडल्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या तक्रारी थेट दिल्ली दरबारी पोहोचल्याने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीच्या स्पर्धेतून माजी आमदार नितीन पाटील यांना माघार घ्यावी लागेल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये माजी खासदार उत्तमसिंह पवार आणि शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यात उमेदवारीसाठी चुरस आहे. दर्डा यांनी लोकसभा लढवण्यास नकार दिला असला तरी खासदार चंद्रकांत खैरे यांना पहिल्यांदा धोबीपछाड देता यावी यासाठी अनेकांनी दर्डांच्या नावाचा आग्रह धरला आहे.


येत्या पाच मार्चला काँग्रेसचे नेते राहुल गांधी शहरात येत असून येथील सभेत उमेदवाराची घोषणा व्हावी, असा आग्रह कार्यकर्त्यांकडून धरला जात आहे. दर्डांसाठीच राहुल यांनी राज्यातील सभेसाठी औरंगाबादची निवड केल्याची चर्चाही पक्षात आहे. त्यामुळे इच्छुकांची यादी लांबलचक असली तरी दोघांतूनच उमेदवार निश्चित होईल, असे उच्चपदस्थ सूत्रांनी म्हटले आहे.


पाच वर्षांपूर्र्वी पराभव पत्करल्यानंतर उत्तमसिंह यांनी नियोजनबद्धपणे प्रचाराला सुरुवात केली. श्रेष्ठींकडून तिकीट मिळेल, असे त्यांनी गृहीत धरले होते. दुसरीकडे लोकसभा लढण्याचा प्रश्नच नसल्यामुळे दर्डांनी आपला औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ सोडून अन्य मतदारसंघाचा विचारच केला नाही. लोकसभा लढविण्याची इच्छा नाही, असेही त्यांनी श्रेष्ठींना लेखी कळवले आहे. तरीही ते खैरेंना पाडू शकतात, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मिलिंद पाटील यांनीही उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असली तरी ते जिल्ह्याबाहेरचे असल्यामुळे खैरेंसमोर त्यांचा निभाव लागणार नाही, असे जिल्हा समितीने यापूर्वीच श्रेष्ठींकडे पाठवलेल्या अहवालात म्हटले आहे.


फाइल राहुलसमोर
काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी नितीन पाटील यांच्या कारनाम्याची फाइल राहुल गांधी यांच्यासमोर सादर केली आहे. त्यामध्ये जिल्हा बँकेत गाजलेले नोकरभरती घोटाळय़ाचा मुख्य मुद्दा पाढे राहुल यांच्या कानी घालण्यात आला. त्यावर राहुल यांनी त्यावर फारसे भाष्य केले नसले तरी आम आदमी पार्टीचा झंझावात सुरू झालेला असताना असा उमेदवार नको, असा त्यांचा पवित्रा होऊ शकतो.


पदाधिकारीही विरोधात
माजी आमदार नामदेव पवार शिवसेनेतून काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत नितीन पाटील यांनी गतवेळी आपणच काँग्रेसचा उमेदवार पाडला, असे वक्तव्य केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचीही कोंडी झाली. आपल्याच उमेदवाराला पाडणार्‍यास पुन्हा तिकीट कसे द्यायचे, असा सवाल इच्छुकांनी उपस्थित केला आहे.