आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉवरमुळे शिवशंकर कॉलनीत भीतीचे वातावरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शिवशंकर कॉलनीतील चौकात एका छोट्याशा इमारतीवर रिलायन्स कंपनीचा भलामोठा टॉवर उभारण्यात आला आहे. या टॉवरमुळे येथील लोक भयग्रस्त झाले आहेत. एक तर ही इमारत खूप लहान आहे, त्यात मनपाची परवानगी न घेताच एका रात्रीतून हा टॉवर उभा करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भर वसाहतीत टॉवरमुळे रेडिएशन होऊन लोक आजारी पडू शकतात. शिवाय हा भला मोठा टॉवर पडून अपघातही होऊ शकतो, असेही येथील रहिवाशांना वाटते. हा टॉवर लवकरात लवकर हटवावा, अशी मागणी लोकांनी थेट मनपा आयुक्तांकडे केली आहे.


जवाहर कॉलनी येथील मुख्य रस्त्यावर शिवशंकर कॉलनी आहे. येथे जगन्नाथ कोर्‍हाळे नावाच्या व्यक्तीची छोटी इमारत आहे. या इमारतीवर त्यांनी रिलायन्स कंपनीच्या टॉवर बसवला आहे. तो उभारताना त्यांनी मनपाची परवानगी घेतली नसल्याचे मनपा प्रशासकीय अधिकार्‍यांनी सांगितल्याचाही दावा येथील नागरिकांनी केला आहे.


काय म्हणतात नागरिक
आम्ही टॉवरच्या समोर राहतो. त्यामुळे खूप भीती वाटते. तो कधीही पडेल ही धास्ती वाटते.
गंगुबाई कावरे, नागरिक
येथे सर्वसामान्य नागरिक राहतात. लहान मुले आहेत. या टॉवरमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे हा टॉवर येथे नकोच.
माला धुळे, नागरिक


मनपाची परवानगी घेतली
माझ्याकडे मनपाची रीतसर परवानगी आहे. मी नागरिकांचे ना हरकत प्रमाणपत्रही घेतले आहे. त्यामुळे नागरिकांचा विरोध नाही असे मला वाटते. माझे संबंध सर्वांसोबत चांगले आहेत. तक्रार अर्जावर केलेल्या सह्या चुकीचे कारण सांगून घेतल्या आहेत. कारण लोकांनीच आमची तक्रार नसल्याचे मला स्वत: सांगितले आहे.
जगन्नाथ कोर्‍हाळे,घरमालक