आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Rename Movment Of Marathwada University

आठवलेंचा युक्तिवाद म्हणजे विद्यापीठ नामांतर दंगलीचे अर्धसत्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - 1978 मध्ये मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रस्ताव विधिमंडळात मंजूर झाल्यावर मराठवाड्यात भीषण दंगली उसळल्या. त्यामागे शिवसेनेसह काँग्रेस आणि समाजवादी नेते होते, असा युक्तिवाद रिपब्लिकन पक्षाचे सर्वेसर्वा खासदार रामदास आठवले यांनी नुकताच केला. हा युक्तिवाद अर्धसत्य असल्याचा सूर मान्यवरांनी व्यक्त केला. जुनी कागदपत्रे तपासून सखोल चौकशी केली तर दंगली कुणी घडवल्या हे सत्य समोर येईल. असे म्हणताना आठवले आता कोणासाठी शिळ्या कढीला ऊत आणत आहेत, असा सवालही केला जात आहे.


दोन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आठवले यांनी नामांतर दंगलीबद्दल शिवसेनेला क्लीन चिट दिली. 1978 मध्ये मराठवाड्यात शिवसेनेचे मजबूत अस्तित्व नव्हते. त्यावेळच्या दंगलीत दलितांवर अत्याचार करण्यात शिवसेनेच्या झेंड्याखाली काँग्रेस आणि समाजवादी मंडळी आघाडीवर होती, असा युक्तिवाद त्यांनी केला. त्यामुळे जुन्या जखमांवरील खपली निघाली. राजकीय-सामाजिक वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील लोकांना काय वाटते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘दिव्य मराठी’ने केला, तेव्हा आठवलेंच्या आरोपात तथ्य आहे. शिवसेना दंगलीत सहभागी नव्हती हे खरे असले तरी पूर्ण सत्य नाही.


कारण काँग्रेसमधील काही नेते, कार्यकर्ते आणि समाजवाद्यांचा एक गट नामांतराच्या विरोधात होता. मात्र, त्याच वेळी काँग्रेसचे अनेक नेते, समाजवादी मंडळी नामांतराच्या बाजूने रस्त्यावर उतरली होती, असे समोर आले. त्या घटनेला 36 वर्षे उलटून गेल्यावर तोच मुद्दा पुन्हा उकरून काढत आगामी लोकसभेसाठी महायुतीकडे दलितांची काही मते वळवण्याचा आठवलेंचा प्रयत्न आहे. त्याला फारसा प्रतिसाद मिळणार नाही, असाही सूर व्यक्त करण्यात आला.

सात जणांचा मृत्यू
27 जुलै 1978 ते 11 ऑगस्ट 1978 कालावधीत नामांतराची दंगल झाली. 300 गावांत हिंसाचार उसळला. 2200 लोकांवर दखलपात्र गुन्हे दाखल झाले. 249 लोक हिंसाचाराच्या घटनेत प्रत्यक्ष सहभागी होते. सात जण मृत्युमुखी पडले. 369 गंभीर जखमी झाले.


निवडणुकीच्या तोंडावर नवा मुद्दा
गोपीनाथ मुंडेंच्या सल्ल्यावरून आठवलेंना निवडणुकीच्या तोंडावर नवा मुद्दा सुचला आहे. मात्र, त्याचा महायुतीला काहीही फायदा होणार नाही. त्या वेळच्या दंगलीत सर्वच पक्षांचे सवर्ण सहभागी झाले होते. तरीही आठवले केवळ काँग्रेस आणि समाजवाद्यांना आरोपीच्या पिंजर्‍यता उभे करत आहेत. वाळलेल्या खोडाला कितीही पाणी घातले तरी त्याला पाने फुटत नसतात, हे आठवलेंनी लक्षात घ्यावे. मराठवाड्याला बदनाम करू नये. चंद्रभान पारखे, ज्येष्ठ नेते, काँग्रेस

जुनाच मुद्दा
लोकसभा डोळ्यासमोर ठेवून आठवलेंनी महायुतीसाठी युक्तिवाद केला. 1978 मध्ये शिवसेना मराठवाड्यात तेवढी ताकदवान नव्हती, हे खरे आहे. काँग्रेसचे काही नेते, कार्यकर्ते नामांतर विरोधात होते. त्यातील अनेक जण नंतर शिवसेनेत दाखल झाले. समाजवाद्यांचा एक गट विरोधात असला तरी दुसरा गट नामांतरवाद्यांच्या बाजूने लढत होता. निशिकांत भालेराव, ज्येष्ठ पत्रकार

(स्रोत : खासदार रामधन समितीचा अहवाल)


1994 मध्ये नामविस्तार होण्यापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही शिवसेनेचे सर्व आमदार भेटलो. त्या वेळी त्यांनीही शांततामय मार्गाने विरोध नोंदवा, दलितांचे रक्त सांडण्याचे काम करू नका, असे आम्हाला स्पष्ट बजावले होते. त्यामुळे आठवलेंचा मुद्दा सत्य आणि रास्तच आहे. चंद्रकांत खैरे, खासदार, शिवसेना उपनेते.

नामांतराविषयी ‘मराठवाडा’ दैनिकातून भूमिका मांडणारे अग्रलेख म्हणजे नामांतरविरोधकांना चिथावणी नव्हे. कारण अनेक समाजवादी नामांतरासाठी तुरुंगातही गेले. गोविंदभाई, अनंतराव भालेराव, नरहर कुरुंदकर आणि स्वातंत्र्यसैनिकांचे ‘मराठवाडा’ नावाशी भावनिक नाते होते. त्यामुळे जुना मुद्दा काढून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न यापलीकडे या युक्तिवादात अर्थ नाही. प्रा. जयदेव डोळे, राजकीय विश्लेषक.