आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार रस्त्यांचे आज फक्त भूमिपूजन, काम 3 मार्चपासून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरातील अतिवर्दळीच्या चार रस्त्यांच्या व्हाइट टॉपिंग कामांचे भूमिपूजन मंगळवारी होत आहे. आचारसंहिता लागण्याच्या भीतीपोटी उद्या फक्त नारळ फोडण्याचा सोहळा होणार असून प्रत्यक्ष कामाला 3 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या रस्त्यांवरून वाहने नेण्यासाठी तीन महिने वाट पाहावी लागणार आहे.


खड्डय़ांत गेलेल्या रस्त्यांबद्दल ‘दिव्य मराठी’ने सातत्याने पाठपुरावा करून मनपाला खडबडून जागे केले. नागरिकही न्यायालयात गेले. त्यामुळे मनपाची यंत्रणा कार्यरत झाली. त्यानुसार जळगाव रोड ते मध्यवर्ती जकात नाका, सावरकर चौक ते सतीश पेट्रोल पंप ते कोकणवाडी, पोलिस मेस ते आंबेडकरनगर चौक मार्गे बळीराम पाटील, क्रांती चौक ते पैठण गेट या रस्त्यांच्या कामांचा ठेका पुण्यातील जेपी एंटरप्रायजेसला देण्यात आला. खासदार चंद्रकांत खैरेंच्या हस्ते भूमिपूजनानंतर तत्काळ कामाला सुरुवात होईल, असे अपेक्षित होते. मात्र, रस्त्याचे मोजमाप, सर्वेक्षणासाठी चार-पाच दिवस लागणार असे म्हणत तीन मार्चपासून काम सुरू करण्याचा दावा शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी केला. कामावर देखरेख ठेवणार्‍या उपअभियंता, शाखा अभियंत्याची निवड लवकरच करून त्यांचे क्रमांक जाहीर करू, असे उत्तर त्यांनी दिले.


पानझडे म्हणतात, हे एवढे सोपे काम नाही
प्रश्न : मंगळवारी फक्त भूमिपूजन की प्रत्यक्ष काम सुरू होणार ?
उत्तर : अहो, हे काम एवढे सोपे नसते. रस्ता करायचा म्हणजे त्याचे सर्वेक्षण करावे लागते. मोजमाप घ्यावे लागते. अतिक्रमणांचा तपशील गोळा करावा लागतो.
प्रश्न : म्हणजे उद्या फक्त भूमिपूजन?
उत्तर : होय. सर्वेक्षणाचे काम चार-पाच दिवसात होईल. त्यानंतर एकाच वेळी चारही रस्त्यांचे काम सुरू होणार आहे.
प्रश्न : सर्व रस्ते केव्हा होतील?
उत्तर : 9 महिने लागतीलच.
प्रश्न : कामाच्या दर्जाचे काय?
उत्तर : मनपा लक्ष ठेवणारच आहे.


डांबरीकरणाच्या पाच कामांना मंजुरी
आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत डांबरीकरणातील पाच रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. मिल कॉर्नर ते महात्मा फुले चौक औरंगपुरा हे काम एम. एस. सिद्दिकी यांना, विवेकानंद चौक ते खिंवसरा लॉन्स, रिद्धी-सिद्धी हॉल ते अष्टपुत्रे दवाखाना तसेच राष्ट्रवादी भवन ते जळगाव रोड, गजानन महाराज मंदिर चौक ते जयभवानीनगर चौक या रस्त्यांची कामे आदिनाथ कन्स्ट्रक्शन्सला देण्यात आली आहेत, तर महावीर चौक ते मिल कॉर्नर चौक या रस्त्याचे काम जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आले.


उद्धव ठाकरेंची वेळ मिळाली नाही
न्यायालयात मनपाने 15 फेब्रुवारीला काम सुरू करणार, असे शपथपत्र दिले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नारळ फोडण्याची तयारी झाली होती. परंतु त्यांचा वेळ मिळाला नाही.


फलकावर मिळेल कामाची माहिती
रस्ता कामावर मनपातर्फे कोणाची देखरेख याची माहिती जाहीर होत नाही. त्यामुळे निकृष्ट कामासाठी कोणाला जबाबदार धरावे, असा प्रश्न असतो. ही बाब लक्षात घेऊन रस्ता कामाविषयी माहिती देणारे फलक लावले जातील. त्यावर कामाचा तपशील, ठेकेदार, मनपाच्या संबंधितांची नावे व माहिती असणार आहे.
आज सुरू होणार्‍या रस्त्यांच्या कामांचा तपशील