आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वधूचे दागिने पळवणारे तिघे पोलिसांच्या जाळ्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीलेश  सोनवणे - Divya Marathi
नीलेश सोनवणे

औरंगाबाद - लग्न समारंभात घुसून वधूचे दागिने लांबवणार्‍या एका अल्पवयीन मुलासह युवक-युवतीला गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतले. या टोळीचा मुख्य सूत्रधार तसेच कुख्यात गुन्हेगार सचिन त्रिभुवन सोनसाखळीसह अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.


गारखेडा परिसरातील सूतगिरणी चौकातील शालिनी बालाजी उमाटे (61) यांचा मुलगा सचिन याचे आठ फेब्रुवारीला सकाळी 9.15 वाजता बीड बायपासवरील रामचंद्र हॉलमध्ये लग्न लागले. 11 वाजता दोन युवक-युवतीने लग्न समारंभात घुसून चार तोळ्यांचे मंगळसूत्र, एक तोळ्याची चेन आणि पाच ग्रॅम चांदीचे नारळ चोरून नेले होते. या वेळी युवक-युवती मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले होते. शालिनी या सोन्याचे दागिने असलेली पर्स घेऊन कार्यालयातील खोलीत गेल्या होत्या. त्यांच्या मागावर असलेला 17 वर्षीय अल्पवयीन बालक त्यांच्यापाठोपाठ खोलीत शिरला. याच वेळी त्याची साथीदार युवती कल्याणी अजय कांबळे (19, रा. श्रीकृष्णनगर, पिसादेवी रोड) हीदेखील मागावर होती. शालिनी यांच्यापाठोपाठ त्यांच्या काही नातेवाईक महिलाही खोलीत गेल्या. शालिनी बोलण्यात व्यग्र असताना बालकाने दागिने असलेली पर्स चोरली. हा बालक खोलीतून बाहेर पडताच कल्याणीदेखील त्याच्यापाठोपाठ पसार झाली. दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शालिनी यांनी सातारा पोलिस ठाण्याशी संपर्क साधला होता. पोलिसांनी यादरम्यान कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील फुटेजही तपासले होते. खबर्‍यामार्फत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अजयकुमार पांडे, सहायक फौजदार साईनाथ महाडिक, शेख रशीद, शेख कैसर, भानुदास पवार, मनोज चव्हाण, सिद्धार्थ थोरात, प्रभाकर राऊत, लालखाँ पठाण, अफरोज खान आणि कमल गदई यांनी सिडको बसस्थानकाच्या आवारात तिघांना पकडले.


अशी करायचे रेकी
नीलेश यशवंत सोनवणे (19, रा. हर्षनगर, लेबर कॉलनी) हा आणि अल्पवयीन बालक स्कूटीवरून बीड बायपासवर फिरायचे.श्रीमंताचा लग्न समारंभ पाहून ते कार्यालयात शिरायचे. नववधूच्या खोलीची पाहणी केल्यानंतर योजना आखायचे. योजना फसलीच तर वेळप्रसंगी पाकीटमारीदेखील करायचे. या टोळीने आतापर्यंत सुमारे 15 ठिकाणी पाकीटमारी केल्याचे पोलिसांना सांगितले आहे.


असे शिरले कार्यालयात
कल्याणी कांबळे ही विवाहित असून तिला दोन महिन्यांचा मुलगा आहे. ती पतीपासून विभक्त राहते. रामचंद्र हॉलमध्ये शिरण्यापूर्वी कल्याणीने तिचा मुलगा नीलेश आणि त्रिभुवन (रा.लेबर कॉलनी) यांच्याकडे सोपवला. हे दोघेही कार्यालयाच्या बाहेर उभे होते. कल्याणी, बालकाने दागिन्यांची पर्स पळवल्यानंतर चौघेही पसार झाले. यानंतर त्यांनी आपसात दागिन्यांची वाटणी केली होती. पोलिसांनी तिघांकडून चार तोळे दोन ग्रॅमचे मणी मंगळसूत्र हस्तगत केले आहे.