आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Saint Eknath Maharaj, Janardhan Swami

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शूलिभंजन टेकडीला वीटभट्ट्यांचा वेढा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत एकनाथ महाराज आणि जनार्दन स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली प्रसिद्ध शूलिभंजन टेकडी चहुबाजूंनी वीटभट्ट्यांनी वेढली गेली आहे. विटा नेण्यासाठी होणा-या वाहतुकीमुळे आधीच अरुंद असलेल्या रस्त्याची पार दाणादाण उडाली आहे. विशेष म्हणजे ही टेकडी एमटीडीसीने आपल्या पर्यटनाच्या यादीत घेतली आहे; परंतु वीटभट्ट्यांच्या प्रदूषणामुळे शेकडो वर्षे जुने असलेल्या या सुंदर धार्मिक पर्यटनस्थळाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. दुसरीकडे या वीटभट्ट्यांपैकी किती अधिकृत आणि किती अनधिकृत आहेत याबाबत तालुका प्रशासनाला काहीही माहिती नाही.
दौलताबादचा घाट ओलांडून वेरूळच्या रस्त्यावर डाव्या हाताला शूलिभंजन टेकडीची कमान दिसते. तेथून आत उंचावर गुरुदत्ताचे मंदिर आहे. संत एकनाथ महाराजांनी याच टेकडीवर 12 वर्षे तपश्चर्या केल्याचे दाखले आहेत. त्यामुळे 1986 मध्ये टेकडीवर मंदिर उभारले गेले. त्यात दत्तप्रभू, जनार्दन स्वामी व संत एकनाथांच्या मूर्तींची स्थापना झाली; पण आता चहुबाजूंनी किमान 50 वीटभट्ट्यांमुळे या भागात धूर, धूळ व प्रदूषणाचा त्रास होत आहे.


दुर्लक्षामुळे विकास खुंटला
शासनाने तीर्थक्षेत्र विकासाअंतर्गत 20 लाखांचा निधी मंजूर केल्याने या टेकडीवर रस्ता, वीज व पाण्याची सोय झाली. पर्यटन विकास महामंडळानेही याचे नाव आपल्या यादीत घेतल्याने लांबचे पर्यटक येथे येऊ लागले, पण गेल्या 10 वर्षांत या परिसराचा विकास खुंटला. त्याचा फायदा घेत चहुबाजूंनी आता वीटभट्टीवाल्यांनी टेकडीला वेढाच घातला.


रस्ते उखडले, कठडे तुटले
टेकडीवर जातानाचा रस्ता आधीच फक्त 12 फुटांचा आहे. त्यातच वीट वाहतुकीसाठी होणा-या रहदारीने तो उखडला. रस्त्यावर धोक्याची वळणे असून संरक्षक कठडे तुटले आहेत. त्यात अनेक वीटभट्ट्या दिसतात. माती-विटा अन् दगडी कोळशाच्या ढिगा-यांतून वाट काढत टेकडीवर जावे लागते. वर असलेल्या सुंदर व्ह्यू पॉइंटचा कठडाही तुटला आहे.
परियों का तालाबही...टेकडीच्या पायथ्याशीच पूर्व दिशेला परियों का तालाब हे ऐतिहासिक ठिकाण आहे. तेथे खूप जुना दर्गा व महादेवाची पिंड असल्याने हिंदू आणि मुस्लिम भाविकांची व पर्यटकांची दर गुरुवारी येथेही गर्दी होते. या मार्गावरही वीटभट्ट्या आहेत. तेथील रस्ताही विटांच्या वाहतुकीने उखडलेला आहे. त्यामुळे एकदा आलेला पर्यटक पुन्हा येण्याचे धाडस करत नाही. चहुबाजूंनी निर्जन जागा असूनही वीटभट्ट्यांच्या धुरात पहाटेपासून येथे प्रदूषण सुरू होते. तरीही गुरुवारी येथे स्थानिक लोकांची गर्दी होते, पण पर्यटनाच्या दृष्टीने या ठिकाणी कोणत्याही सुविधा नाहीत.


थेट सवाल

अनिता भालेराव
तहसीलदार, खुलताबाद
शूलिभंजन टेकडीला वीटभट्ट्यांचा विळखा पडला आहे...
-रॉयल्टी भरून कोणीही वीटभट्टी सुरू करू शकतो. याबाबत आम्हालाच परवानगी देण्याचे अधिकार आहेत.
त्यात किती वीटभट्ट्या अवैध आहेत?
-त्याची माहिती मला सर्व गोष्टी पाहूनच सांगावी लागेल. फार पूर्वीपासून या भागात अनेक वीटभट्ट्या सुरू आहेत.
पण त्यामुळे प्रदूषण होते. रस्तेही खराब होत आहेत.
-याबाबत शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पर्यटन विकास महामंडळाने तेथील जागा मागितली आहे. त्यावर शासकीय निर्णय झाला तरच या सर्व गोष्टी थांबवता येतील.


जागेसाठी पाठपुरावा सुरू आहे
शूलिभंजन टेकडी पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. तीर्थक्षेत्र विकासाच्या यादीतही या टेकडीचे नाव आहे. असे असूनही विकास मात्र हवा तसा झाला नाही. आम्ही तेथे मोठी जागा मागितलेली आहे. त्याचा पाठपुरावा जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे. ते झाल्यास या टेकडी परिसराचा विकास घडवून हे स्थळ आणखी सुंदर करू.
-सुनीता जोशी, अधिकारी, एमटीडीसी