आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Tanappa Peraswami, Divya Marathi

‘दिव्य मराठी’च्या पुढाकारानंतर तनप्पा पेरास्वामीवर उपचार सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आठ दिवसांपूर्वी अपघातात जखमी झालेल्या पीईएस पॉलिटेक्निक महाविद्यालयातील विद्यार्थी तनप्पा पेरास्वामी याची प्रकृती अजूनही गंभीर असून शनिवारी पैशाअभावी त्याच्यावरील उपचार थांबवण्यात आले होते. सामाजिक जाणिवेतून ‘दिव्य मराठी’ने पुढाकार घेऊन कमलनयन बजाज हॉस्पिटलच्या प्रशासनाला पेरास्वामी कुटुंबीयांची नाजूक आर्थिक परिस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने त्याच्यावर उपचार सुरू केले.
तनप्पाच्या उपचारासाठी आतापर्यंत दोन लाख रुपये लागले आहेत. त्यापैकी 49 हजार रुपये त्याचे महाविद्यालयातील मित्र आणि कॉलेजच्या प्राध्यापकांनी दिले. इतर पैसे जमवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र पुढील उपचारांसाठी अधिक पैसे लागत असल्याने त्याच्यावरील उपचार थांबवण्यात आले होते.त्यामुळे ‘दिव्य मराठी’ने पुढाकार घेऊन हॉस्पिटल प्रशासनाला त्याच्या कुटुंबीयांच्या नाजूक आर्थिक परिस्थितीबाबत कल्पना दिली. त्यामुळे हॉस्पिटलने परिस्थिती समजून घेत उपचार सुरू ठेवले आहेत. तनप्पाला लाइफ सेव्हिंग ड्रग्स आणि इतर अत्यावश्यक उपचार सुरू राहतील, अशी माहिती हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नीरज उत्तमणी यांनी दिली. इंडस्ट्रियल व्हिजिट रद्द करून विद्यार्थी तनप्पाच्या उपचारासाठी पैसे देत आहेत. प्रत्येकी 1500 रुपये अशी रक्कम त्यांनी महाविद्यालयाकडे भरली आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य जितेंद्र देहाडे यांनीही पुढाकार घेतला असून प्राचार्य त्र्यंबक महाजन यांची भेट घेतली. त्याचबरोबर विविध सरकारी योजनांचा लाभही तनप्पाच्या उपाचारासाठी कशा प्रकारे करता येईल, यासाठी देहाडे प्रयत्न करीत आहेत.


आईच्या डोळ्यांतील अर्शू थांबेनात
15 वर्षांपूर्वी तनप्पाचे कुटुंब पोट भरण्यासाठी तामिळनाडू येथून औरंगाबादला आले. ते सध्या कटकट गेट भागात राहतात. दोन बहिणी आणि तनप्पा अशी तीन भावंडे आहेत. शिक्षण घेऊन तो उरलेल्या वेळेत गोळ्या-बिस्किटे विकण्याचे काम करत होता. तनप्पा हा होतकरू विद्यार्थी असून दिल्ली आयआयटी येथे झालेल्या रोबोटिक्स स्पध्रेत त्याने मराठवाड्याचे नेतृत्व केले होते. या अपघातामुळे त्याचे आई-वडील सुन्न झाले आहेत. तनप्पाच्या आईच्या डोळ्यांतून दिवसरात्र अर्शूंच्या धारा वाहत आहेत.


माणुसकी म्हणून मदत करावी
तनप्पाचे मित्र माणुसकी म्हणून त्याच्या उपचारासाठी दिवस-रात्र पैसे जमा करण्यासाठी फिरत आहेत. महाविद्यालयीन प्रशासनाचे सहकार्य यासाठी अपेक्षित आहे. माणुसकी म्हणून त्याच्या उपचारासाठी मदत करावी, असे वाटते. जितेंद्र देहाडे, सदस्य , काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र