औरंगाबाद - दहावीची परीक्षा सव्वीस मार्चला संपली. ताणातून सुटलो एकदाचे, म्हणत विद्यार्थी मौजमस्ती करू लागले. परीक्षेनंतर अकरा दिवसांनी सोमवारी सहा विद्यार्थी हसरूल तलावात पोहण्यासाठी गेले. त्यापैकी दोघे माघारी फिरले. चौघांना पोहण्याचा मोह अनावर झाला अन् त्यांना जीव गमवावा लागला.
हसरूल तलावावर पोहण्यासाठी गेलेले सय्यद जबिउद्दीन कादरी सय्यद युसूफ हुसामुद्दीन कादरी (17), सय्यद जुनैद कादरी सय्यद फैजोद्दीन कादरी (17), ओसामा मोहंमद जमिरोद्दीन मोहंमद अमोदी (16) आणि सय्यद मुस्तकीम सय्यद सलीम (16) यांच्यावर काळाने घाला घातला. दुपारी दीड वाजता हसरूल तलावाच्या काठावर चौघांचे कपडे, बूट, चपला पडलेल्या आणि शेजारी दुचाकी उभी होती. तितक्यात एका शर्टमधील मोबाइल खणखणला. पोलिस कॉन्स्टेबलने तो फोन उचलला आणि त्यांच्या नातेवाइकांना कळवले.
..अन् ते दोघे वाचले
मुलांच्या मृत्यूची वार्ता कळताच बुढीलेन, रोहिला गल्ली आणि जुना बाजारातील नागरिकांनी तलावाजवळ मोठी गर्दी केली होती. मृतांपैकी सय्यद मुस्तकीम, ओसामा मोहंमद आणि सय्यद जुनैद हे बुर्हाणी नॅशनल हायस्कूलमध्ये शिकत होते, तर सय्यद जबिउद्दीन ज्युबिली पार्कमधील मॉडेल हायस्कूलमध्ये शिकत होता. चौघांनी नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षेचा ताण संपताच सुटीत मौजमजा करावी म्हणून सोमवारी सकाळी आठच्या सुमारास दोन दुचाकींवर सहा जण ट्रिपलसीट हसरूल तलावावर गेले होते. त्यापैकी दोघे पोहायचे नसल्याचे सांगून तेथून निघून गेले. याच्यानंतर चौघे तलावात पोहण्यासाठी गेले.
चप्पल-बूट, मोबाइल दिसला
सकाळी 11 च्या सुमारास तलावावरील सुरक्षा रक्षक भालसिंग कणिसे आणि कैलास वाणी यांना दूरवरून काठावर प्लेझर दुचाकी दिसली. मात्र या वेळी त्यांनी दुचाकीकडे दुर्लक्ष केले. दोघे पुन्हा दुपारी दीडच्या सुमारास तेथे आले. त्या वेळी त्यांना पुन्हा दुचाकी (एमएच 20 बीयू 6270) त्याच ठिकाणी आढळली. शेजारी चौघांचे कपडे, चप्पल, बूट आणि एक मोबाइल दिसला. बर्याच वेळापासून दुचाकी उभी असल्याने आणि तलावात पोहताना कोणीही दिसत नसल्याने चौघे बुडाल्याचा संशय सुरक्षा रक्षकांना आला. खातरजमा करण्यासाठी अग्निशमन दलाने तलावाच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा दोनच्या सुमारास अग्निशमन दलाला सय्यद जबिउद्दीनचा मृतदेह हाती लागला. याच्यानंतर अवघ्या 15 मिनिटांनी जुनैद आणि ओसामाचा मृतदेह आढळला. पोलिसांनी या तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीत हलवले. मात्र सायंकाळपर्यंत सय्यद मुस्तकीमचा मृतदेह सापडला नव्हता. बेगमपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मोहंमद ओसामाचे वडील सौदीमध्ये
मोहंमद ओसामाचे वडील जमीरुद्दीन मोहंमद हे सौदी अरेबियामध्ये काही कामानिमित्त गेले होते. त्यांना घटनेची माहिती कळवण्यात आली. ओसामा एकुलता एक मुलगा होता. त्याला चार लहान बहिणी आहेत. जमीरुद्दीन मोहंमद हे कुटुंबासह सय्यद हुसामुद्दीन कादरी यांच्या घरात भाड्याने राहतात. घटनेनंतर ओसामाच्या आईला मोठा धक्का बसला असून त्यांना आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे नातेवाइकांनी सांगितले.