आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपिटीने उडवली नागरिकांची दाणादाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने ऐन फेब्रुवारीत धांदल उडाली. बुधवारी सायंकाळी 4.45 च्या दरम्यान धो धो पाऊस कोसळला. अर्ध्‍या तासात 14.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. अवकाळी पावसामुळे रस्त्यावरील खड्डय़ांत मोठी तळी साचल्याने वाहनधारक, पादचार्‍यांना त्याचा त्रास सहन करावा लागला.


दिवसभर आकाश निरभ्र होते. कमाल तापमान प्रथमच 32.6 अंशांवर पोहोचले. हवेत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. आर्द्रता 80 टक्क्यांवर गेली होती. त्यामुळे सायंकाळी 4.45 च्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्यास सुरुवात झाली. हवेचा वेग ताशी 46 किमी होता. त्यामुळे चिकलठाणा परिसरातील सलीमनगर, हिनानगर, कामगार कॉलनी, मसनतनगर भागातील घरावरील पत्रे उडाली. सावित्रीनगर येथील शिंदे कुटुंब यामध्ये जखमी झाले. ज्योतीनगर, गारखेडा परिसर, आदित्यनगरमध्ये वृक्ष उन्मळून पडले. याचबरोबर शहरातील वीजपुरवठा तीन तास खंडित झाला होता. जाधववाडी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत गहू, मका, हरभरा, तूर आदींच्या गोण्या अचानक आलेल्या पावसाने भिजल्या.


नैसर्गिक अस्मानी संकटामुळे गहू, शाळू ज्वारी, मका, हरभरा, करडई आणि मोसंबी, आंबा, टोमॅटो, वांगे, मेथी आदी पालेभाज्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. याचे कृषी विभागाने तत्काळ सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देवगावचे शेतकरी दीपक जोशी व चिकलठाणा वॉर्डाचे नगरसेवक संजय चौधरी यांनी केली आहे.


का पडतोय पाऊस?
हिंदी महासागरातील पृष्ठभागातील पाण्याचे तापमान वाढून हवामानात अनपेक्षित बदल झाले. त्यामुळे राज्यात विविध ठिकाणी गारपिटीसह अवकाळी पाऊस पडत आहे. आणखी चार ते पाच दिवस असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी पिकांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. डॉ. रामचंद्र साबळे, हवामानतज्ज्ञ.


या भागांत वीजपुरवठा खंडित
छावणी, पन्नालालनगर, सर्मथनगर, ज्योतीनगर, मिल कॉर्नर, पहाडसिंगपुरा, पडेगाव रोड, मध्यवर्ती बसस्थानक, निराला बाजार, विभागीय क्रीडा संकुल, उल्कानगरी, गारखेडा परिसर, हसरूल, मुकुंदवाडी, चिकलठाणा आदी परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. तीन ते पाच तास वीजपुरवठा बंद होता. यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.