आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकच्या धडकेत पोलिसाचा अंत, रात्रपाळी करून घरी परताना घडली घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - रात्रपाळी करून सहकार्‍यासह दुचाकीवरून घरी परतणार्‍या वाळूज पोलिस ठाण्यातील दोघा कर्मचार्‍यांना भरधाव ट्रकने ठोकरले. त्यात पोलिस शिपाई अरुण निवृत्ती उघडे (42) यांचा मृत्यू झाला, तर पोलिस नाईक प्रमोद पवार गंभीर जखमी झाले. ही घटना नगर-औरंगाबाद महामार्गावरील ए. एस. क्लबसमोर मंगळवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास घडली.


उघडे हे दोन वर्षांपासून वाळूज पोलिस ठाण्यात कार्यरत होते. ते मूळचे पैठण तालुक्यातील पिंपळवाडी येथील रहिवासी असून टीव्ही सेंटर भागातील पोलिस वसाहतीत वास्तव्यास होते. बीट मार्शल असेलेल्या दोघांनी ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री गस्त घातली. ड्यूटी आटोपल्यानंतर सकाळी ते पवार यांच्यासोबत दुचाकीवरून (एमएच 20सीई 1159) घरी जाण्यास निघाले. उघडे यांची दुचाकी पवार चालवत होते तर उघडे पाठीमागे बसले होते. ए. एस. क्लबसमोरील नवीन मुंबई महामार्गाकडे जाणारा चौक ओलांडताच पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने (एचआर 55बी 9333) त्यांच्या दुचाकीला ठोकरले. यात त्यांच्या डोक्याला व गुप्तांगाला जबर मार लागला. पवार यांच्याही डोक्याला व शरीरावर जखमा झाल्याने दोघांनाही तातडीने घाटी शासकीय ट्रकच्या धडकेत पोलिसाचा अंत
रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. घाटीत जाईपर्यंत उघडे हे मदत करणार्‍यांशी स्पष्टपणे बोलत होते; परंतु घाटीतील डॉक्टरांची शिफ्ट बदलत असताना त्यांना तत्काळ उपचार मिळाले नाहीत. परिणामी, काही वेळात शुद्ध हरपून त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या सहकार्‍यांनी सांगितले. त्यांना दोन मुली असून त्या इंजिनिअरिंग करत आहेत, तर मुलगा अकरावीला आहे. दरम्यान, जखमी पवार यांना सिग्मा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी ट्रकचालक महेंद्रपाल साईदास हरिजन (48, रा. गुरदासपूर, ता. जि. पठाणकोट) यास ताब्यात घेतले आहे.


पिंपळवाडीत अंत्यसंस्कार
उघडे हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. ड्यूटी क रून घरी परततानाही त्यांनी सहकार्‍यांशी थट्टा-मस्करी करत पोलिस ठाण्याचा निरोप घेतला. त्यानंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटांतच नियतीने त्यांच्यावर घाला घातला. घाटी रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर त्यांचा मृतदेह पिंपळवाडी येथे नेण्यात आला. तेथे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी ग्रामस्थांसह पोलिस कर्मचारी, अधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.