आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीआर प्रकरण: नगर भूमापक जैस्वालांविरुद्ध दोषारोपपत्र सादर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्येष्ठ नागरिकाला पीआर कार्ड देण्यात दिरंगाई केल्याबद्दल परिरक्षण भूमापक आर. के. जैस्वाल यांना दोषी ठरवून त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. चौकशी सुरू करण्यापूर्वी त्यांनी आपले म्हणणे 10 दिवसांत मांडावे, असेही नगर भूमापन अधिका-यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. याबाबत डीबी स्टारने 21 मार्च 2014 रोजी ‘पीआर कार्डासाठी ज्येष्ठाचा छळ’ या मथळयाखाली वृत्त प्रकाशित केले होते.
पीआर कार्ड मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक मोहन देशपांडे यांनी 8 आॅगस्ट 2013 रोजी नगर भूमापन कार्यालयातील परिरक्षण भूमापक आर. के. जैस्वाल यांच्याकडे आवश्यक सर्व कागदपत्रांसह अर्ज दाखल केला होता. जैस्वाल यांनी हे प्रकरण वरिष्ठ अधिका-यांसमोर सादर न करता सात महिने प्रलंबित ठेवले. नंतर चूक लपवण्यासाठी त्यांनी 26 फेब्रुवारी 2014 रोजी नगर भूमापन अधिका-यांकडून इतर प्रकरणांसोबत देशपांडे यांच्या प्रकरणाची नामांतर टिप्पणीदेखील मंजूर करून घेतली. याच कालावधीत देशपांडे यांनी पीआर कार्डबाबत प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली असता जैस्वाल यांनी अरेरावीची भाषा वापरत प्रकरण पुन्हा प्रलंबित ठेवले.
विभागीय चौकशीचे आदेश
पीआर कार्ड प्रकरण प्रलंबित ठेवल्याबद्दल जैस्वाल यांना आधी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर जैस्वाल यांनी नोटिसीला उत्तर दिले. देशपांडे यांच्या कागदपत्रांमध्ये तफावत असून त्यांनी खोटी तक्रार केल्याचा लेखी खुलासा सादर करत कारणे दाखवा नोटीस मागे घेण्याची विनंती केली. त्यांचा हा खुलासा असमाधानकारक असल्याचे वरिष्ठांच्या लक्षात आले. त्यानंतर जैस्वाल यांच्याविरुद्ध चौकशी केली. त्यात त्यांना दोषी ठरवण्यात येऊन ते शिक्षेस पात्र असल्याचा अहवाल दिला. त्यानंतर नगर भूमापन अधिकारी कपोते यांनी जैस्वाल यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले.
दोषारोपांची चौकशी होईल
जैस्वाल यांनी 10 दिवसांच्या आत बचावाचे लेखी निवेदन सादर करावे, असे आदेश दिले आहेत. आम्ही ठेवलेले दोषारोप त्यांनी स्पष्टपणे मान्य किंवा अमान्य करणे अपेक्षित आहे. विवरणपत्रात नमूद केलेल्या दोषारोपांची केवळ चौकशी करण्यात येईल. त्यांनी दिलेल्या मुदतीत लेखी निवेदन सादर न केल्यास त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
-आर. डी. कपोते, नगर भूमापन अधिकारी