आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Visit To Hailstorm Effected Area, Divya Marathi

कुजलेले हरभरे, तुरीची टरफलं अन् गहूही झाला मातीमोल !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रानात फुललेल्या पिकातून यंदा चांगले उत्पन्न होईल. पोरीचे लग्न करता येईल. बायका-पोरांना चांगले कपडे खरेदी करता येतील. पुढल्या वर्षीच्या खताची बेगमी करता येईल, अशी स्वप्ने पाहत असलेल्या शेतक-यांच्या आशा-आकांक्षा गारपिटीने मातीमोल केल्या. कुजलेले हरभरे, तुरीची टरफले आणि भूसही होऊ शकणार नाही असे गहू पाहून बळीराजा अक्षरश: मूक झाला. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने सोयगाव, सिल्लोड तालुक्याला भेटी दिल्या. तेव्हा हे विदारक चित्र समोर आले.
गहू, हरभरा, तूर, ज्वारी, मका अन् बरेच काही आपापल्या सोयीने म्हणजे पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतक-यांनी पिके घेतली. गहू सोंगायला आला होता, मका, तूर, हरभ-यांची काढणी लगेच सुरू करायची होती. काही ठिकाणी सूर्यफूल कात टाकत होते. पण ध्यानीमनी तसेच हवामान खात्याच्या अंदाजातही नसलेली गारपीट झाली अन् सर्व चित्रच बदलले.
हरभरे जमिनीवर, तुरी रिकाम्या : टरफल फुटून हरभरे जमिनीवर पडले. दोनच दिवसांत ते सडले अन् कुजलेही. तुरीची झाडे उभी दिसतात, पण टरफल रिकामे. झाडावर एकही पान नाही. तुरी जमीनदोस्त झालेल्या. तुरीच्या झाडांचा वापर फारतर सरपण म्हणून होईल. जेथे 60 क्विंटल गहू होणार होता तेथे आता फार फार तर 5 क्विंटल होईल. तो खाण्यालायक नाही. माणसे कशीही जगतील, पण गव्हाचे भूस जनावरे खाणार नाहीत. जगायचे ते कसे अन् रडायचे कसे, असा प्रश्न पंडित कुटे यांनी केला. केंद्राचे पथक येईल, मदत मिळेल, असे जाहीर होते. पण 60 क्विंटलच्या जागी फक्त पाच क्विंटल गहू होतोय. त्याची भरपाई कशी मिळणार असाही त्यांचा सवाल आहे. पिंपळगाव पेठ येथील शेतक-यांनी रब्बीत मक्याची लागवड केली. दोन पैशासह चा-याचीही व्यवस्था व्हावी, हा त्यामागील उद्देश. घास तोंडाशी आला होता. दीड तासांच्या गारपिटीने ती मातीत मिसळली. हिरव्यागार मक्याला एकही पान शिल्लक राहिले नाही. शासनाच्या भरपाईतून माझी कणसे मला परत मिळतील का, असा प्रश्न रघुनाथ भोसले यांनी उपस्थित केला.
दीड तासात होत्याचे नव्हते; केंद्रीय पथकासमोर शेतक-यांची कैफियत
नुकसान हेक्टरमध्ये
1,11,209 औरंगाबाद
92,640 जालना
अशी आहेत पथके
संजीव चोप्रा व प्रदीप इंदूलकर - औरंगाबाद, जळगाव
एन. के. कश्मिरा व दयानंद मीना- नांदेड, हिंगोली
दीनानाथ व एस. एम. पालवे - बीड, अंबाजोगाई, लातूर
रामानंद, विनोद
सिंग- भोकरदन, परभणी व परळी
08 लाख हेक्टरचे शासकीय आकड्यानुसार नुकसान
16 लाख हेक्टर प्रत्यक्षात रब्बी नष्ट झाल्याचा अंदाज
मदत म्हणजे तालुक्याला जाण्यासाठी बसचे भाडे
दुष्काळाच्या सामना केलेला शेतकरी थकलेला नाही. शासनाकडून मदत किती मिळेल, याची त्याला अपेक्षा नाही, यापूर्वी शासनाकडून मिळालेली मदत म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी दिलेले बसचे भाडे, हे त्याला ठाऊक आहे. शासन मदतीचा अनुभवही पाठीशी आहे. दुष्काळातून सावरल्यानंतरचे हे संकट आहे.
माणुसकीच्या नात्याने मदत करा : राज ठाकरे
गारपिटीमुळे जमीनदोस्त झालेल्या शेतक-यांना सर्वांनीच माणुसकीच्या नात्याने मदत करावी, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. औरंगाबादेत ते म्हणाले, पंचनामे आणि इतर तांत्रिक मुद्द्यांत सरकारी यंत्रणा अडकली आहे. मनसे आपत्तीग्रस्त शेतक-यांना मदत करणार आहे. तसे कामही आम्ही सुरू केले आहे.
केंद्राची चार पथके मराठवाडाभर रवाना
नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय अधिका-यांची चार पथके दाखल झाली असून गुरुवार, शुक्रवारी पाहणी केल्यानंतर सायंकाळी विभागीय आयुक्तालयातून केंद्रीय सहसचिव संजीव चोप्रा हे सर्व अधिका-यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून आढावा घेतील. त्यानंतर पथक केंद्राकडे अहवाल सादर करेल. त्यानंतर मदत स्पष्ट होईल. बुधवारी सायंकाळपर्यंतच्या पंचनाम्यात आठ लाख हेक्टरवरील रब्बी पिके नष्ट झाल्याचे म्हटले आहे. अजून 50 टक्के पंचनामे शिल्लक असून हा आकडा 16 लाख हेक्टरच्या वर जाईल, असा प्रशासनाचाच अंदाज आहे.
दीड लाख गुंतवले,
हाती लागल्या काड्या
‘साहेब, पहिल्यांदाच टोमॅटो लावले. दीड लाखापर्यंत गुंतवणूक केली. आता माल काढायचा होता, पण गेल्या आठवड्यात दीड तास गारा कोसळल्या अन् सगळे होत्याचे नव्हते झाले. आता शिल्लक राहिल्या फक्त एकही पान नसलेल्या काड्या,’ ही कैफियत आहे औरंगाबाद तालुक्यातील रहाळपट्टी तांडा येथील शेतकरी गोविंदा बागू चव्हाण यांची. केंद्रीय पथकासमोर या शेतक-यांनी व्यथा मांडली.
पथक औरंगाबाद, सिल्लोड आणि पुढे जळगाव जिल्ह्यात गेले. पाहणीची सुरुवात औरंगाबाद तालुक्यातून रहाळपट्टी तांडा येथून झाली. रहाळपट्टी गावात पथकाने हिरामण रामा खासगे यांच्या नासधूस झालेल्या गव्हाची पाहणी केली. त्यानंतर गावातील शाळेचे उडून गेलेले पत्रेही बघितले. चव्हाण यांची अडीच एकर शेती आहे. एका एकरावर त्यांनी टोमॅटो लावले होते. उर्वरित जागेत कांदा आणि ज्वारीचे पीक होते. टोमॅटो, कांद्याच्या लागवडीसाठी त्यांचे दीड लाख रुपये खर्च झाले. आता टोमॅटोपासून उत्पन्न मिळणार होते. कमी भावामुळे त्यांनी हिरवे टोमॅटो काढले नाही. कांदाही पंधरा दिवसांत हाती येणार होता, पण अवघ्या दीड तासाने दीड लाखाची गुंतवणूक मातीत घातली. गावातील प्रत्येकाचे असेच हाल झाले आहेत.
आम्हालाच सावरायचे
पथकाने शेतक-यांशी बोलणी केली तेव्हा झालेले नुकसान प्रत्येकाने दाखवले, पण यातील कोणीही मदत किती अन् कधी देणार, असा प्रश्न विचारला नाही. काय झाले ते बघा, आमचे आम्हालाच सावरायचे आहे, अशी प्रतिक्रिया शिवा चव्हाण यांनी दिली.