आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Water Shortage, Divya Marathi

पाण्याचे हाल संपता संपेना;आज पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेली पाण्याची बोंब शनिवारीही सुरूच राहिली. सिडको, हडको, गारखेडा परिसरासह अनेक भागांत आज पाणीच आले नाही. परिणामी या भागातील नागरिकांचे हाल झाले. दरम्यान, शनिवारी रात्रीपर्यंत जायकवाडी व फारोळ्यात विजेने दगा न दिल्याने उद्या पाणीपुरवठा ब-यापैकी सुरळीत होईल, अशी मनपाला आशा आहे.

गेल्या 35 दिवासांत 49 वेळा वीज खंडित झाल्याने औरंगाबादच्या पाणीपुरवठ्याचे तीनतेरा वाजले आहेत. नागरिकांतील रोष वाढत असून हाणामा-यांचे प्रकार सुरू झाले आहेत. वीज मंडळ व महानगरपालिका यांच्यात समन्वय नसल्याने हा प्रश्न निकाली निघण्यास विलंब झाला. आता कुठे तो सोडवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या आठवड्यात विजेचा प्रश्न सुटेल, असे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे पाण्याची ओरड शनिवारीही सुरू राहिली. सुदैवाने आज जायकवाडी, फारोळा, ढोरकीन, नक्षत्रवाडी येथील वीजपुरवठा खंडित न झाल्याने पाण्याचा उपसा दिवसभर सुरू होता. मनपासाठी ही बाब दिलासादायक असून यामुळे उद्या पाणीपुरवठा ब-यापैकी सुरळीत होईल, अशी मनपाला आशा आहे.

शनिवारी ज्या भागात पाण्याचा दिवस होता त्यापैकी अनेक भागांत पाणीच आले नाही. पुंडलिकनगर, न्यायनगर, गारखेडा, सिडको, हडकोचा परिसर आदी भागांत आज पाणी आलेच नाही. परिणामी नागरिकांचे पुन्हा हाल झाले. टँकर मागवून पाण्याची सोय करण्याचे प्रयत्न या भागात सुरू होते. याशिवाय काल सिडको, हडकोसह काही भागात मध्यरात्रीनंतर पाणी आले. त्यामुळे झोपी गेलेल्या नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागली. पाण्याच्या वेळा मुळीच पाळल्या जात नसल्याने नागरिकांच्या झोपा उडवण्याचा हा प्रकार असल्याचे संतप्त उद्गार नागरिकांनी काढले.

कोल्हेंकडे पूर्ण पदभार द्या
दरम्यान, पाणीपुरवठा विभागाला पूर्णवेळ कार्यकारी अभियंता नसल्याने या विभागाचे नियोजन व अंमलबजावणी करताना अनेक अडचणी येत आहेत. सध्याचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्याकडे रस्त्यांची कामे आहेत व पाणीपुरवठ्याचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यांच्याकडे पाणीपुरवठ्याचा पूर्ण कार्यभार द्यावा, अशी मागणी करणारे पत्र काँगे्रसचे नगरसेवक प्रमोद राठोड यांनी आज मनपा आयुक्तांना दिले आहे. या पत्रात त्यांनी पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.