आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Water Shortage, Summer, Aurangabad Municipal Corporation

उन्हाच्या चटक्यासोबत पाणीटंचाईच्याही झळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - उन्हाळा सुरू होताच पाण्याची ओरड सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा पुरवठय़ाचे वेळापत्रक कोलमडले आहे. पहाटे चातकासारखी पाण्याची वाट पाहणार्‍या नागरिकांना चक्क तीन-चार तास उशिरा पाणी आल्याने त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आज तर महापौर कला ओझा यांच्या वॉर्डातही व्हॉल्व्ह खराब झाल्याने पाण्याची बोंब झाली. दुसरीकडे मनपाने मात्र पाणीपुरवठा सुरळीत असल्याचे सांगत काही ठिकाणी किरकोळ अडचणी आल्याचे सांगितले आहे.


शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची या पंधरवड्यातील ही दुसरी घटना आहे. टाक्या न भरणे, पाण्याची लेव्हल न येणे, पुरेसा दाब नसणे अशा विविध कारणांमुळे पाण्याचे गणित बिघडले आहे. त्याचा फटका ऐन उन्हाळ्यात नागरिकांना बसत आहे. दोन आठवड्यांपूर्वी सिडको आणि हडको परिसरात कमी दाबाने आणि उशिराने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर पाण्याच्या दाबात सुधारणा करण्यात आल्याने तो प्रश्न मार्गी लागला. पण आता पुन्हा तोच प्रश्न निर्माण झाला आहे.


ज्या भागांत पहाटे पाणी येते, तेथे नागरिक वाट पाहत असताना चक्क चार-चार तास उशिराने पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय काही भागांत अतिशय कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. पाण्याच्या वेळापत्रकावर नागरिकांचे दिवसभराचे वेळापत्रक अवलंबून असल्याने त्याचाही फटका नागरिकांनाच बसत आहे.


पाण्याचा गंभीर प्रश्न नाही
यासंदर्भात पाणीपुरवठय़ाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी सांगितले की, पाणीपुरवठय़ाचा गंभीर प्रश्न कुठेही नाही. तसे आमच्या निदर्शनास आलेलेही नाही. काही ठिकाणी किरकोळ समस्या येतात. त्या दूर केल्या जातील. आज महापौरांच्या वॉर्डात व्हॉल्व्हची समस्या होती, ती तातडीने दूर करण्यात आली आहे.


तलाव पावसाळ्यापर्यंत पुरणार
गतवर्षीच्या दुष्काळात कोरडाठाक पडलेला हसरूल तलाव यंदा चांगल्या पावसामुळे भरला. त्यात पुरेसा जलसाठा असून नोव्हेंबर महिन्यापासून त्यातून शहरातील 21 वॉर्डांना पाणीपुरवठा केला जात आहे. तलावात आजही पाण्याची पातळी पुरेशी असल्याने यंदा 15 जूनपर्यंत तरी तलावातील पाणी वापरण्यात बिलकुल अडथळा येणार नाही, असेही कोल्हे यांनी सांगितले.


काम सोडून टँकरची प्रतीक्षा
हसरूल भागातील बहुतेक बोअर कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या टँकरवरच सर्व जण अवलंबून आहेत. काम सोडून नागरिकांना टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे.


या वसाहतींचे घसे कोरडे
गेल्या दोन दिवसांत शहानूरवाडी, चौसरनगर, ज्योतीनगर, प्रतापनगरचा पूर्वेकडील भाग, देवानगरी, विजय कॉलनी, विद्यानगर, गारखेडा परिसर, जवाहर कॉलनी, सिडको एन-4 आणि इतर काही भागांत पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक बिघडले आहे.


पाण्यासाठी प्रचंड धावपळ
महापौर कला ओझा यांच्या वॉर्डात आज सकाळी पाणीच आले नाही. दुपारी पाणी सोडण्यात आले. यासंदर्भात माहिती घेतली असता व्हॉल्व्ह खराब झाल्याने ही परिस्थिती आल्याचे सांगण्यात आले. दुरुस्तीचे काम तातडीने करून उशिरा पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र, सकाळच्या वेळात पाणी न आल्याने नागरिकांची प्रचंड धावपळ उडाली.