आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi,Wrestling, Divya Marathi

लहान वयात उत्तुंग भरारी घेणारा पोखरीचा कुमार पहिलवान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरची जेमतेम परिस्थिती असतानाही त्याने शिक्षण सोडले नाही. अभ्यास करतच तो कुस्तीचा सरावही करत राहिला. याचे फळही त्याला मिळाले. शालेय स्तरावरील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्याने भारतातून दुसरा क्रमांक पटकावून आपल्या गावाचे नाव उंचावले. अविनाश हरणे असे या कुमार कुस्तीपटूचे नाव आहे. कमी वयात उत्तुंग भरारी घेणार्‍या अविनाशचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


औरंगाबादपासून काही किलोमीटर अंतरावर पोखरी गाव आहे. या गावात राहणारा अविनाश पळशी येथील धारेश्वर शाळेत नववीमध्ये शिकत आहे. त्याला लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती. शिकत असताना ही आवड त्याने जोपासली. यासाठी त्याने वेळापत्रक बनवून अभ्यास व कुस्तीचा सराव यांची सांगड घातली. सुरुवातीला विविध स्पर्धांत भाग घेऊन बक्षिसे पटकावली. पाचवीत असताना त्याने हसरूल येथील हरिप्रसाद म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली तालीम सुरू केली होती.


आर्थिक अडचणींवर केली मात
अविनाशच्या घरची परिस्थिती जेमतेम आहे. वडील शेतीबरोबरच दुसर्‍यांच्या शेतात ट्रॅक्टर चालवतात. अशातच भारतीय क्रीडा महासंघ आयोजित 59 व्या शालेय राष्ट्रीय कुस्ती स्पध्रेत सहभागी होण्याची त्याला संधी मिळाली. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे जाण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. अशा वेळी त्याला शाळेतून आर्थिक मदत मिळाली. वडिलांनी दिलेल्या आणि मित्रांकडून घेतलेल्या पैशांतून कानपूर गाठले. या स्पर्धेत 42 किलो वजन गटातून अविनाशने प्रतिस्पध्र्याला अस्मान दाखवत दुसरा क्रमांक पटकावला.


अविनाशला घेतले दत्तक
पोखरीचे नाव देशपातळीवर झळकावणार्‍या अविनाशला पंचायत समितीचे सदस्य सुनील हरणे यांनी दत्तक घेतले आहे. घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे तो जास्त खर्च करू शकत नाही. त्यामुळे अविनाशचा सर्व खर्च सुनील हरणे उचलत आहेत. आजपर्यंत अविनाशने तालुका व राज्यपातळीवर 2 सुवर्ण, तर 2 चांदीची पदके प्राप्त करून इतर स्पर्धांतूनही प्रमाणपत्रे मिळवली आहेत.


तालीम आणि शिक्षणाची सांगड
पहाटे पाच ते आठ वाजेपर्यंत आखाड्यातील तालीम, दुपारी शाळा आणि पुन्हा सायंकाळी आखाड्यात तालीम, असा त्याचा दिनक्रम असतो. हे करत असताना शिक्षणाकडे कधीच दुर्लक्ष केले नसल्याचे तो म्हणतो. गावातच आयोजित अनेक कुस्ती स्पर्धांत अविनाशने पहिला क्रमांक मिळवला. तसेच चौका, नायगाव, बेगमपुरा आणि अमरावती येथील कुस्ती स्पर्धांतही त्याने अनेक बक्षिसे पटकावली.


घराण्यात कोणी कुस्ती खेळत नाही, परंतु मला कुस्तीची आवड आहे. कुस्ती स्पर्धांद्वारे पोखरीचे व कुटुंबाचे नाव उंचवायचे आहे. त्यासाठी शिक्षणाबरोबरच खेळाकडेही लक्ष देत आहे.
अविनाश हरणे, खेळाडू


घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. मुलगा कुस्तीत जम बसवत असल्यामुळे आनंद मिळत आहे. चांगली तालीम मिळाल्यास नक्कीच तो यशस्वी होईल.
कमलाजी हरणे, वडील.