आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ग्राहकांना आपण वापरलेल्या विजेची अचूक माहिती मिळावी यासाठी वीज बिलावर मीटरच्या ताज्या रीडिंगचे छायाचित्र प्रसिद्ध केले जाते, पण ही छायाचित्रे अस्पष्ट असल्याने ग्राहक या माहितीपासून वंचित राहतो. वीज अधिनियम 2003 प्रमाणे ग्राहकाला आपण किती युनिट वीज वापरली, कशाच्या आधारावर बिल दिले हे जाणण्याचा अधिकार आहे. परंतु जीटीएल देत असलेल्या बिलांवर रीडिंगची छायाचित्रेच दिसत नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून तर ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले येत आहेत. त्यामुळे शहरातील अनेक ग्राहक त्रस्त झाले आहेत. बिलांचा आकडा पाहून कित्येक सर्वसामान्य ग्राहकांना धक्का बसत आहे.
जीटीएलची कार्यप्रणाली नेहमीच वादाची राहिलेली आहे. अनियमित सेवा, कधी कनेक्शन देण्यास टाळाटाळ, तर कधी अव्वाच्या सव्वा बिलांमुळे जीटीएलवर नेहमीच तक्रारींचा पाऊस पडतो. अनेकदा हातात पडलेल्या बिलातील युनिटवरून ग्राहक आणि वीज या वीज कंपनीत वाद होतात. आपण एवढी वीज वापरलीच नाही. रीडिंग न घेता अंदाजे बिल देण्यात आले आहे, असा ग्राहकांचा आरोप असतो. असे वाद टाळण्यासाठी ‘महाराष्टÑ वीज नियामक कायदा- 2003’ मध्ये बिलावर मीटर रीडिंगचे छायाचित्र प्रकाशित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पण अस्पष्ट छायाचित्रांमुळे या नियमाचा हेतूही अस्पष्टच राहतोय.
नियम काय सांगतो ?
विजेसंबंधीची प्रकरणे महाराष्टÑ वीज नियामक कायदा 2003 अन्वये चालवली जातात. यानुसार ग्राहकांना त्यांनी नेमकी किती वीज वापरली, कशाच्या आधारावर त्यांना बिल देण्यात आले हे जाणण्याचा पूर्ण अधिकार आहे. एखाद्या ग्राहकाची बिलासंबंधी तक्रार असेल तर हे छायाचित्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. यामुळेच बिलावर मीटर रीडिंगचे छायाचित्र टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. महावितरणच्या काळात सुरू झालेली ही पद्धत जीटीएल पुढे नेत आहे. परंतु ही छायाचित्रे दिशाभूल करणारी असून त्याचा फायदा तर होत नाहीच, उलट त्यामुळे खोळंबाच जास्त होत आहे.
अनेक बिलांवर छायाचित्रेच नाहीत
महावितरण असताना दोन महिन्यांत एकदा बिल येत असे. जीटीएलने दरमहा बिले देण्यास सुरुवात केली. पण ही बिले ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. त्यावरून प्रचंड वाद होत आहेत. ते सोडवायला ग्राहक जीटीएलच्या ग्राहक सेवा केंद्रात धाव घेतो. तेथे त्यास बिलावरील छायाचित्रात रीडिंग बघण्याचा सल्ला दिला जातो. पण अर्ध्याअधिक ग्राहकांच्या बिलांवरील छायाचित्रात काहीच स्पष्ट दिसत नाही. काही बिलांवर चक्क छायाचित्रेच नसल्याचे स्पष्ट होते. डीबी स्टारकडे अशी अनेक बिले आहेत. यामुळे बिलांवर छायाचित्र टाकण्याचा मुख्य हेतू साध्य होत नाही.
केस 1- चारपट बिलाचा झटका
प्रदीपसिंग चौहान यांचे हनुमाननगर येथे स्वत:चे घर आहे. घराचे मीटर शंकर मनाजी म्हस्के यांच्या नावावर आहे. त्यांचा दरमहा 150 ते 200 युनिटदरम्यान वीज वापर होता. मात्र, जानेवारीमध्ये त्यांना अचानक 654 युनिट वापरासाठी 6 हजार 233 रुपये बिल आले. याबाबत त्यांनी जीटीएलच्या पुंडलिकनगर येथील ग्राहक सेवा केंद्रात तक्रार केली. त्यांनी बिलावरील छायाचित्र अस्पष्ट असल्याचे जीटीएलच्या निदर्शनास आणून दिले. चौहान यांनी जीटीएलकडे मीटरच्या मूळ छायाचित्रांची मागणी केली. पण ते दाखवण्यास जीटीएल तयार नव्हते. रीडिंग न घेताच अंदाजे बिल दिल्याचा चौहान यांचा आरोप आहे. याबाबत त्यांचा जीटीएलशी वाद सुरू आहे.
केस-2 अंदाजे बिलामुळे बीपी वाढला
संजयनगर भागात राहणाºया विठ्ठल वाणी यांना दरमहा 80 ते 100 युनिटचे बिल येत होते, पण गेल्या महिन्यात जानेवारीमध्ये त्यांनी तब्बल 689 युनिट्स वापरल्याचा दावा जीटीएलने केला आहे. यासाठी वाणी यांना तब्बल 9055 रुपये बिल देण्यात आले. निवृत्त शासकीय कर्मचारी असलेले वाणी यांचा हे बिल पाहून बीपी वाढला. त्यांनी जीटीएलकडे चुकीचे बिल दिल्याची तक्रार केली. जीटीएलच्या ग्राहक सेवा केंद्रात त्यांना बिलावरील छायाचित्रातील रीडिंग तपासण्यास सांगण्यात आले. पण या छायाचित्रात काहीच दिसत नव्हते. छायाचित्र अस्पष्ट आहे तर बिल कशाच्या आधारावर दिले, असा प्रश्न त्यांना पडला. याप्रकरणी त्यांचा जीटीएलशी वाद सुरू आहे.
2.65 लाख मीटरसाठी फक्त 122 कर्मचारी
शहरात जीटीएलचे 2 लाख 65 हजार 868 ग्राहक आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने असणाºया ग्राहकांच्या मीटर रीडिंगसाठी अवघे 122 कर्मचारी आहेत. त्यांना मीटर रीडर असे म्हटले जाते. सुरुवातीला हे सर्व कंत्राटी पद्धतीने कार्यरत होते. पण नुकतेच त्यांना जीटीएलच्या कायमस्वरूपी सेवेत घेण्यात आले आहे. ग्राहक संख्येच्या तुलनेत रीडरची संख्या खूप कमी आहे. पूर्वी रीडिंग घेतल्यानंतर रीडर त्याची नोंद आपल्या पुस्तिकेत करायचा. पण आता रीडर केवळ छायाचित्र घेतात आणि ती जीटीएल कार्यालयात डाऊनलोड करतात. तेथे बॅक ऑफिसमध्ये या बिलावरून ग्राहकाने वापरलेल्या वीज युनिट्सची संगणकात एंट्री केली जाते. त्यावरून बिल तयार होते. पण बिलावरील अस्पष्ट छायाचित्रे, छायाचित्रच नसणे हे प्रकार रीडिंग घेतली नसल्याने जाणीवपूर्वक केले जात असल्याचा ग्राहकांचा आरोप आहे.
अंदाजे बिल दिले
जीटीएलने मला रीडिंग न घेताच बिल दिले आहे. बिलावरील छायाचित्रात काहीच दिसत नाही. याबाबत तक्रार केली असता कोणीच समाधानकारक उत्तर देण्यास तयार नाही.
- प्रदीपसिंग चौहान, हनुमाननगर
छायाचित्र गायब झाले
माझ्या बिलावर तर छायाचित्रच नाही. नियमाने हे छायाचित्र असायला हवे होते. विचारणा केली तर कोणीच उत्तर देत नाही. इमारतीमधील एकाही सदस्याच्या बिलावर छायाचित्र नाही.
-एक त्रस्त ग्राहक
यापुढे काळजी घेऊ
बिलावर मीटरचे छायाचित्र स्पष्ट असणे बंधनकारक आहे. हा काही तांत्रिक दोष असेल. यापुढे याबाबत काळजी घेतली जाईल.
-समीर पाठक, जनसंपर्क अधिकारी, जीटीएल
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.