आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - ज्येष्ठ नागरिकांचा एकाकीपणा आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पोलिस आयुक्त संजय कुमार यांच्या पुढाकाराने हेल्पलाइन सुरू करण्यात आली. याला उदंड प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 13 पोलिस ठाण्यांतर्गत जवळपास 1300 ज्येष्ठ नागरिकांनी मदतीसाठी नोंदणी केली आहे.
ज्येष्ठांसाठीच्या नियंत्रण कक्षाचे शनिवारी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जास्तीत जास्त ज्येष्ठांनी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संजय कुमार यांनी केले. शहरातील अनेकांची मुले परदेशात, बाहेरगावी असतात. कुटुंबातील सर्वजण नोकरीनिमित्ताने सकाळीच घराबाहेर पडत असल्याने ज्येष्ठांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. ही बाब लक्षात घेत हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पोलिस ठाण्यात जाऊन नोंदणी करणार्या ज्येष्ठांना स्मार्ट कार्डदेखील दिले जाणार असून फार्मास्युटिकल्स असोसिएशनतर्फे वृद्धांना स्वस्त दरात औषधी दिली जाणार आहे. ज्येष्ठांनी हेल्पलाइनजवळ मदत मागितल्यास काही मिनिटांत पोलिस हजर होतील. शिवाय हव्या त्या ठिकाणी मदत पोहोचवली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधण्यासाठी त्यांच्यातील 17 स्वयंसेवक तयार झाले आहेत. दिवस-रात्र या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मदत मिळणार असल्याचेही ते म्हणाले.
पोलिस नेहमी वाईट काम करतात, असे म्हटले जाते; परंतु ते काही चांगल्या गोष्टीही करत असल्याचे न्या. चपळगावकर म्हणाले. या वेळी उपायुक्त सोमनाथ घार्गे, अरविंद चावरिया, डॉ. जय जाधव, सहायक पोलिस आयुक्त अजित बोर्हाडे यांची उपस्थिती होती.
येथे मागा मदत
काही अडचण असल्यास ज्येष्ठ नागरिकांनी 9767331100, 100, 2240500, 2351347/48 या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.