आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विकास मंच: मनपात गेल्याने लोकांचे नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सिडकोने सुनियोजित वसाहती तयार करून सुविधा दिल्या; पण आठ वर्षांपूर्वी सिडकोचे मनपाकडे हस्तांतर झाले. त्यानंतर सिडको-हडको भागाकडे मनपाचे दुर्लक्ष झाल्याने लोकांचे नुकसानच झाले. त्यामुळे या भागासाठी स्वतंत्र नगरपालिका झाली पाहिजे, अशी मागणी आता नव्याने पुढे आली आहे.


‘दिव्य मराठी’तर्फे रविवारी सिडकोतील गणेशनगरात ‘विकास मंच’ कार्यक्रम घेण्यात आला. यात कर भरूनही नागरी सुविधा मिळत नसल्याने सिडकोसाठी स्वतंत्र नगरपालिका करायला हवी, असे मत ज्येष्ठ नागरिक व निवृत्त तहसीलदार गोरखनाथ पोतदार यांनी मांडले आणि उपस्थितांना टाळ्यांच्या कडकडाटात पाठिंबा दिला. या आधी सिडकोच्या हस्तांतरणाच्या वेळी हीच मागणी पुढे आली होती. त्या वेळी सिडकोच्या अखत्यारीत असताना मिळणार्‍या सुविधा, सेवा मनपाकडून मिळणार नाहीत, अशी मागणी करणार्‍यांची भूमिका होती; पण त्याची फारशी दखल न घेता हस्तांतर झाले. याशिवाय तत्कालीन नगरसेवक विनायक पांडे यांनीही 2006 मध्ये सिडको, हडको आणि परिसरासाठी स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी केली होती. सरकारने सातारा, देवळाईसाठी स्वतंत्र पालिका जाहीर केल्याने सिडकोवासीयांच्या जुन्या मागणीला पुन्हा धुमारे फुटले आहेत. पोतदार यांनी स्वतंत्र नगरपालिकेचा विषय काढताना या भागातून होणार्‍या करवसुलीचा मुद्दा मांडला. या संदर्भात महानगरपालिकेची आकडेवारी पाहता ब आणि इ या दोन वॉर्डांत विभागलेल्या सिडको, हडको भागातून मनपाचा मालमत्ता कर व पाणीपट्टीपैकी 35 ते 40 टक्के वसुली होत असते. असे असताना कर न भरणार्‍या शहराला सिडकोचा पैसा जात असल्याची खंत इतर नागरिकांनीही व्यक्त केली.


मुळात औरंगाबाद महानगरपालिकेची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे. सातारा, देवळाई यांचा मनपात समावेश केला असता, तर अधिक फायदा झाला असता. सिडको तर वेगळी नगरपालिका करायलाच नको. उलट नगरपालिकेला जो पैसा दिला जातो, तोच महानगरपालिकेला दिला, तर त्या भागांचा विकास करता येईल. मुश्ताक अहमद, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस


उत्पन्नाचा मुद्दा कळीचा
सिडको-हडकोतून चांगली करवसुली होते. वेगळी पालिका केल्यास ती या उत्पन्नावर चालणे अवघड आहे. पालिका तयार करताना केवळ सिडको-हडको असा विचार केला, तर हद्द तयार करणेही अवघड बनते. काशीनाथ कोकाटे, ज्येष्ठ नगरसेवक


सिडकोकडे परत द्या
मुळात सिडको-हडको मनपात जायलाच नको होते. सिडको त्यांना सुविधा देत असे, त्या आता मनपा देऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती असून नागरिक हताश झाले आहेत. वसाहत पुन्हा सिडकोकडे दिली पाहिजे. सय्यद अक्रम, शहराध्यक्ष काँग्रेस


अनेक प्रश्न निर्माण होतील
नागरिकांची भूमिका व्यवहार्य नाही. फक्त करवसुलीवर भागत नाही. जकात वसूल कशी करायची हा प्रश्न निर्माण होईल. शिवाय शासनाकडून येणार्‍या अनुदानावर परिणाम होऊन सारीच व्यवस्था ढेपाळून जाईल. बाळासाहेब थोरात, शहरप्रमुख, शिवसेना


विकास करता येईल
काही सुविधा कमी-जास्त असतील, तर त्या देता येतील. करवसुली जास्त म्हणून त्या भागाला अधिक सुविधा असा दुजाभाव करता येणार नाही, पण नागरिकांच्या अपेक्षा निश्चितच पूर्ण करता येतील. आहे त्यात विकास शक्य आहे. संजय जोशी, उपमहापौर


काहीच साध्य होणार नाही
उत्पन्नाचे साधन नसताना असा विचार करणे चुकीचे आहे. स्वतंत्र नगरपालिका झाल्यास मनपाचे नुकसान होणार आहे. अशा मागण्या करून काहीच साध्य होणार नाही. आशा मोरे, विरोधी पक्षनेत्या


निधी कमी होईल
स्वतंत्र नगरपालिका केली, तर मनपा छोटी होईल. शासनाचाही निधी कमी येईल. त्यासाठी सिडको-हडकोचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. नारायण कुचे, स्थायी समिती सभापती