आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: रिलायन्स मॉलला ठोठावला दहा हजार रुपयांचा दंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बाजारभावापेक्षा कमी दराची जाहिरात करून प्रत्यक्षात गुड नाईट लिक्विडवर एमआरपीपेक्षा तीन रुपये अधिक घेतल्यामुळे ग्राहक मंचाने रिलायन्स मॉलला १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच संबंधित ग्राहकालाही पाच हजार रुपये नुकसान भरपाई खर्चापोटी दोन हजार रुपये देण्याचा आदेश दिला आहे. 
 
आविष्कार कॉलनीतील रहिवासी अमितकुमार वसंतराव सबनीस यांनी रिलायन्स रिटेल लिमिटेड मधून ११ डिसेंबर २०१६ रोजी घरगुती वापराच्या वस्तू खरेदी केल्या होत्या. सर्व वस्तूंपोटी त्यांनी एक हजार ९९ रुपये ८२ पैसे अदा केले होते. बिल बारकाईने पाहिल्यानंतर गोदरेज कंपनीच्या गुड नाइट लिक्विडच्या बॉक्सवर एमआरपी ६९ रुपये असताना बिलामध्ये मात्र त्याची किंमत ७२ रुपये लावल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी मॉलच्या व्यवस्थापकांकडे तक्रार केली. मात्र, त्यांच्याकडून अधिकचे पैसे परत देण्यास नकार मिळाल्याने त्यांनी ग्राहक मंचात जाण्याचा निर्णय घेतला. २९ डिसेंबर २०१६ रोजी त्यांनी ग्राहक मंचामध्ये अॅड. आनंद मामीडवार यांच्यामार्फत तक्रार दाखल केली. 
 
चार महिन्यांत निकाल 
तक्रार दाखल केल्यानंतर ग्राहक मंचाने अवघ्या चारच महिन्यांत म्हणजे २९ एप्रिल २०१७ रोजी प्रकरणाचा निकाल दिला. रिलायन्स रिटेल लिमिटेडने ग्राहकाकडून अधिकचे पैसे घेतल्याचे सिद्ध झाल्याने ग्राहक मंचाने रिलायन्सला १० हजार रुपये दंडाची रक्कम ग्राहक मंचाच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश दिले. तसेच ग्राहक सबनीस यांना नुकसान भरपाईपोटी पाच हजार रुपये खर्चापोटी दोन हजार रुपये देण्याचे आदेश दिले. मंचाच्या अध्यक्षा नीलिमा के. संत, सदस्य किरण ठोले, संध्या बारलिंगे यांनी हा निकाल दिला. 
 
बेहिशेबी रक्कम जमा करण्याची शक्यता 
हानिकाल देताना ग्राहक मंचाने रिलायन्सला चांगलेच फटकारले आहे. अशा पद्धतीने ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रक्कम जमा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा बेलगाम व्यापारी प्रवृत्तीला आळा घालणे, हे ग्राहक संरक्षण कायद्याचे आद्य कर्तव्य आहे, असेही मंचाने म्हटले आहे. 
बातम्या आणखी आहेत...