आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपाळू अधिका-यांना झापले; बैठकांमध्ये मोबाइलवर बंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहराच्या नागरिकांसाठी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असताना स्थायी समितीच्या बैठकीत चक्क झोपणारे आणि मोबाइलवर चॅटिंग करणा-या अधिका-यांची छायाचित्रे ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित करताच स्थायी समिती सभापतींनी या सर्व अधिका-यांना आपल्या दालनात बोलावून झापून काढले. एवढेच नव्हे तर स्थायी समितीच्या बैठकीत यापुढे मोबाइलवर बोलता येणार नाही, गरज असेल तर सभागृहाबाहेर जाऊन बोला, असे निर्देशच त्यांनी जारी केले. तशा आशयाचे पत्रच सर्व विभागांना दिले जाणार असल्याचे सभापती विजय वाघचौरे यांनी सांगितले.
एलबीटी, मालमत्ता कर, गुंठेवारी, साफसफाई अशा सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा सुरू असताना मनपाचे अधिकारी मात्र चक्क झोप काढत होते तर काही जण मोबाइलवर चॅटिंग करत होते. अशा सगळ्या अधिका-यांची नावानिशी छायाचित्रे ‘दिव्य मराठी’ने आजच्या अंकात प्रकाशित केली. त्यामुळे आज मनपात एकच खळबळ उडाली. कालच्या बैठकीत अधिका-यांच्या अनुपस्थितीमुळे आधीच संतापलेल्या सभापती विजय वाघचौरे यांनी आज दुपारी आपल्या दालनात या सर्व अधिका-यांना बोलावून घेत चांगलेच फैलावर घेतले. बैठक सुरू असताना सदस्य पोटतिडकीने बोलत
असतात, त्यांना हवी ती माहिती अधिकारी देत तर नाहीतच उलट चक्क डुलक्या काढतात हे बेजबाबदारपणाचे लक्षण असल्याचे वाघचौरे म्हणाले. बैठक सुरू असताना मोबाइल वापरणा-या अधिका-यांवरही ते बरसले. महत्त्वाचे एसएमएस पाहत होतो, माहिती मागवत होतो, असे उत्तर देणा-या अधिका-यांना ते म्हणाले की, बैठक सुरू असताना असे प्रकार बिलकुल व्हायला नको.
मला बैठक सुरू असताना 50 कॉल्स आले, पण ते आपण घेतले नाहीत की, मेसेजही केले नाहीत. इतर सदस्यही फोनसाठी सभागृहाबाहेर जातात. मग अधिकाºयांनी असे वागणे चुकीचे आहे. यापुढे अधिकाºयांना सभागृहात मोबाइलचा वापर करता येणार नाही. फोनवर बोलायचे असल्यास बाहेर जाऊन बोलावे, तशा आशयाचे पत्रच आपण सर्व विभागप्रमुखांना देणार असल्याचे वाघचौरे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले