आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद पंचायत समितीमध्ये पी. बी. लहाने हे कनिष्ठ आरेखक या पदावर अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. गेल्या सहा वर्षांपासून स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाची तांत्रिक कामे लहाने यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. त्यामुळे स्थापत्य सहायकांना कोणतीच कामे नाहीत. तसेच घरकुल कामांच्या गुणवत्तेवरही याचा परिणाम होत आहे. नियमानुसार लहाने यांना अभियांत्रिकी शाखेशी संबंधित कोणतीच कामे करण्याचा अधिकार नाही, परंतु गटविकास अधिकार्यांच्या वरदहस्तामुळे त्यांना हा अधिकार वर्षानुवर्षे मिळत आला आहे. यासंदर्भात लहाने यांचा पदभार काढून घेतला असल्याचे प्रभारी गटविकास अधिकारी स्नेहा देव सांगतात. मात्र, याबाबत अद्याप कोणतेच पत्र देण्यात आले नसल्याचे कार्यालयीन अधीक्षक दारवंटे यांनी डीबी स्टारला सांगितले.
नियमांची सर्रास पायमल्ली
कनिष्ठ आरेखक हे नॉन-टेक्निकल पद आहे. नियमानुसार अशा कर्मचार्यांना केवळ टेबल जॉब करण्याची परवानगी असते. तसेच कनिष्ठ अभियंत्याला कार्यालयीन मदत करणे, माहिती अधिकाराच्या संचिका पाहणे आणि इतर कार्यालयीन कामे करणे अशी त्याची कामे आहेत. असे असतानाही लहाने यांच्याकडे 2012-13 मधील 50 टक्के घरकुलांची कामे सोपवण्यात आली आहेत. तसेच लहाने गावांचे दौरे करतात आणि इंदिरा आवास योजनेच्या स्थळ पाहणी अहवालावरही सह्या करतात. त्यामुळे मूळ काम असलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांना कोणतेच काम शिल्लक राहिलेले नाही. आम्हाला काम द्या, अशी पंचायत समितीच्या तीन सहायकांची मागणी आहे. विशेष म्हणजे एका स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाला चक्क भांडाराचा पदभार सोपवण्यात आला आहे.
चालू वर्षाची कामेही दिली
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत 2012-13 साठी औरंगाबाद तालुक्यातील एकूण 132 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. कनिष्ठ अभियंत्यांना सोपवण्यात आलेल्या एकूण 50 टक्के कामांमध्ये सहायक म्हणून पी. बी. लहाने यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पंचायत समिती आणि बांधकाम उपविभागातील एकूण नऊपैकी केवळ दोनच स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांना मंजूर घरकुलांची कामे देण्यात आली.
पदभार काढून मिळणार ‘पदभार’
औरंगाबाद पंचायत समितीमधील यांत्रिकी विभागाचा कर्मचारीदेखील कार्यसूचीबाहेरील कामे करत असल्याचे डीबी स्टारच्या तपासात आढळून आले आहे. कनिष्ठ आरेखक पी. बी. लहाने यांच्याकडे असलेला स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाचा पदभार काढून त्यांना पुन्हा कार्यसूचीबाहेरचे म्हणजेच पाणीटंचाईचे काम सोपवण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरू आहेत. एकीकडे तांत्रिक पदभार काढला, असे दाखवायचे आणि पुन्हा जुन्याचीच री ओढायची, हाच प्रकार येथे होणार आहे.
जबाबदारी असलेल्या लोकांची कामे काढून भलत्याच कर्मचार्याला देण्याचा प्रकार औरंगाबाद पंचायत समितीमध्ये सुरू आहे. संबंधित तीन कर्मचार्यांना ‘बेकाम’ करून कनिष्ठ आरेखकाला काम देण्याचा ‘अर्थ’ काय? असा प्रश्न उपस्थित होतो. डीबी स्टारने प्रकरणाचा तपास केला असता चौकशीचा फार्स रचण्यात आल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय विभागात समन्वयदेखील नाही.
चौकशी झालीच नाही
यासंदर्भात भ्रष्टाचार निर्मूलन अभियानाचे मराठवाडा उपप्रमुख (युवा) अंबादास तळणकर यांनी 10 जानेवारी 2012 रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर यांना चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. नंतर बाविस्कर यांनी बांधकाम उपविभागाचे उपअभियंता जमिल अहेमद मुतरुजा यांना 30 जानेवारी 2012 रोजी चौकशी करून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. मात्र, मुतरुजा यांनी कोणतीही चौकशी केली नाही. त्यानंतर त्यांना तीन स्मरणपत्रेही देण्यात आली, तरीही त्यांनी चौकशी केली नाही. तक्रारदाराने पाठपुरावा सुरू ठेवल्यानंतर मुतरुजा यांनी थातूरमातूर चौकशी करून प्रकरण निकाली काढले. विशेष म्हणजे चौकशी अहवालात पी. बी. लहाने गटविकास अधिकार्यांच्या आदेशाने इंदिरा आवास योजनेचे काम करतात आणि दौरे करतात, असा स्पष्ट उल्लेख आहे. घरकुल योजनेचे काम पाहणे आणि दौरे करणे ही कामे कनिष्ठ आरेखकाच्या कार्यसूचीमध्ये नाहीत, हे माहीत असतानाही प्रकरण निकाली काढण्यात आले, हे येथे उल्लेखनीय आहे.
आम्ही आदेशानुसारच काम करतो
-यांत्रिकी विभागाचा कर्मचारीसुद्धा पाणीटंचाईचे काम पाहतो. इतरही अनेक जण कार्यसूचीबाहेरील कामे करतात, मग मी केले तर त्यात शासनाचे काय नुकसान होत आहे? मी गटविकास अधिकार्यांच्या आदेशानुसारच इंदिरा आवास योजनेअंतर्गत दौरे करतो आणि स्थळ पाहणी अहवालावर सह्या करतो.
-पी. बी. लहाने, -कनिष्ठ -आरेखक
पदभार काढून घेतला
- पी. बी. लहाने यांच्याकडे असलेला पदभार आम्ही काढून घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे चार्ज असल्याने तेच सर्व कामे पाहत होते. मात्र, ते चुकीचे आहे.
-स्नेहा देव, -प्रभारी गटविकास अधिकारी
अद्याप पदभार काढलेला नाही
-पी. बी. लहाने यांच्याकडील पदभार काढून घेण्यासंदर्भात अद्याप कोणताच पत्रव्यवहार झालेला नाही. ही बाब प्राथमिक टप्प्यात असून गटविकास अधिकार्यांच्या मान्यतेनंतरच पदभार काढण्यात आल्याचे पत्र लहाने यांना देण्यात येईल.
-संजय दारवंटे, -कार्यालयीन अधीक्षक, पंचायत समिती, औरंगाबाद
त्यांचा जॉब चार्ट मागवला आहे
-या प्रकरणी चौकशी सुरू असून गटविकास अधिकार्यांकडून पी. बी. लहाने यांच्या कामाची माहिती (जॉब चार्ट) मागवली आहे. त्यामध्ये दोष आढळल्यावर कारवाई प्रस्तावित केली जाईल.
-भरतकुमार बाविस्कर, -कार्यकारी अभियंता, जि. प. बांधकाम विभाग
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.