आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Pilgrim Renukadas Deshpande Missing In Uttarakhand Flood

‘त्या’ सावित्रीला आस पती परतण्याची!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - उत्तराखंडातील गौरीकुंड येथे कुटुंबीयांना महाप्रलयातून वाचवण्यासाठी रेणुकादास यांनी सर्वांना हॉटेलबाहेर काढले, पण वडिलांचे मधुमेहाचे औषध आणण्याकरिता काही क्षणासाठी हॉटेलमध्ये गेल्यानंतर हॉटेलच कोसळले. बेपत्ता पती कुठून तरी येईल व चिमुकल्यांना कुरवाळत धीर देईल, अशी आशा त्यांची पत्नी मनीषा देशपांडे यांनी बाळगली आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला सर्वत्र वटसावित्री पौर्णिमेचे व्रत करत असताना मनीषा यांना पती परतण्याची आस लागली आहे. जोपर्यंत पती मिळणार नाहीत तोपर्यंत गावी परतणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

परभणी येथील माधवराव देशपांडे हे पत्नी मालती, मुलगा रेणुकादास, सून मनीषा व नातू विवेक आणि र्शावणी असे सहा जण चार धाम यात्रेसाठी गेले होते. 17 जूनला गौरीकुंडात झालेल्या महाप्रलयात सर्व देशपांडे कुटुंबीय हॉटेलमध्ये होते. रेणुकादास यांनी सर्वांना बाहेर काढल्यामुळे सर्वांचे प्राण वाचले, परंतु तेच उंच लाटांमध्ये बेपत्ता झाले. कुटुंबीयांनी दोन दिवस त्यांचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. महाप्रलयाची बातमी रेणुकादास यांचे काका व शहरातील निवृत्त सैन्य अधिकारी मंगेश देशपांडे यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता डेहराडून गाठून गौरीकुंडला कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांना परत आणण्याचा प्रयत्न केला, परंतु मनीषा यांनी पतीला पाहिल्याशिवाय गावी न परतण्याचा ठाम निर्धार केला आहे.

मंगेश यांनी कशीबशी समजूत काढून देशपांडे कुटुंबीयांसह 150 जणांना 15 किलोमीटरचा प्रवास करत गुप्तकाशी येथे आणले. त्या मार्गावर अनेक अडथळे असल्याने मंगेश यांनी गावकरी राजेश ओसवान यांच्या मदतीने लाकडी पूल बनवला. सर्वांना ऋषिकेशपर्यंत आणण्यात आले आहे. महाप्रलयातून सुखरूप बचावलेल्या सर्व भाविकांना आपापल्या गावाकडे जाण्याचे वेध लागले असताना रेणुकादास यांचे कुटुंबीय मात्र त्यांच्या शोधात ऋषिकेशला असल्याची माहिती मंगेश यांनी त्यांचे बंधू विश्वजित देशपांडे यांना फोनवरून दिली. त्याप्रमाणे विश्वजित यांनी सर्व हकिगत ‘दिव्य मराठी’ला सांगितली.


यांचा अजूनही पत्ता लागेना
केदारनाथ यात्रेवर गेलेले दिनेश जेथलिया (55), दुर्गा जेथलिया (51), नरेश जेथलिया (32), खुशबू जेथलिया (28), भगीरथ जेथलिया (57), विनायक म्हसलेकर (32), नारायण काबरा (45), मीनाक्षी काबरा (42), निकिता काबरा व मोहित काबरा हे बेपत्ता आहेत.