आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Pilgrims Return From Uttarakhand Floods

महाप्रलयाचा अनुभव : सहा दिवस कपारींतून पायपीट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - उत्तराखंडातील महाप्रलयाचा अनुभव आयुष्यात कधीच विस्मरणात जाणार नाही. पावलोपावली मृत्यूचे भय आणि अन्न-पाण्याविना तब्बल सहा दिवस डोंगर कपारीतून मैलोन्मैल पायपीट करताना गावी परतणार की नाही याची सतत भीती वाटत होती, अशी भावना सेलू (जि.परभणी) इंदाराम पवार (63) यांनी ‘दिव्य मराठी’ कडे व्यक्त केली.

पवार व त्यांची पत्नी लता (55), बहीण हौसाबाई आर्दड (58) हे तिघेजण मंगळवारी गौरीकुंडहून शहरात परतले. या वेळी पवार यांनी महाप्रलयाच्या चित्तथरारक आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, र्शीरामपूर येथील अंबिका ट्रॅव्हल्सतर्फे आम्ही 15 जूनला रात्री 10 वाजता हरिद्वारच्या अलीकडील गौरीकुंडला पोहोचलो. आमचा 153 जणांचा ग्रुप 16 जूनला सकाळीच केदारनाथकडे रवाना होणार होता. मात्र, मुसळधार पाऊस सुरू असल्याने एक दिवस तेथेच मुक्काम वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

16 जूनला रात्री 8 ते 8.30 वाजेदरम्यान ढगफुटी झाली. हा महाप्रलय इतका भयंकर होता की, सर्वांचे मन हेलावून गेल्याचे त्यांनी सांगितले. तब्बल सहा दिवस न काही खाता-पिता जीव मुठीत घेऊन 14 किलोमीटरची पायपीट करत 21 जूनला हरिद्वार गाठले. गाडीचे चालक कुलकर्णी यांचा मुलगा सर्वांदेखत पुरात वाहून गेला; परंतु कोणीही त्याला वाचवू शकले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.