आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - बनावट महिला उभी करून पडेगावात प्लॉट विक्री केला. भंडाफोड होणार असल्याची कुणकुण लागताच निवृत्त परिचारिकेचा बळकावलेला प्लॉट पुन्हा त्याच महिलेला उभे करून तिच्या नावावर करणार्या महिलेसह एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
पहाडसिंगपुरा भागातील प्रतिभा विश्वंभर वाघमारे (61) या घाटी रुग्णालयातील निवृत्त परिचारिका आहेत. त्यांच्यासह 16 जणांना 1989 मध्ये पडेगावातील गट क्र. 55 मध्ये एक एकर जागेची विक्री मिर्झा महेमूद बेग मिर्झा खलील बेग यांनी केली होती. यानंतर जागेची मोजणी करून प्लॉट पाडण्यात आले होते. दरम्यान शंकर अर्जुन शेजूळ (63, रा. एकनाथनगर) यांनीदेखील प्लॉट खरेदी केला होता.
शेजूळ यांनी वाघमारे यांच्या प्लॉटची बनावट कागदपत्रे तयार करून छायाबाई संतोष हिवराळे (35, रा. शिवाजीनगर) यांना उभे केले. 16 ऑगस्ट 2011 रोजी वाघमारे यांचा प्लॉट कन्नड तालुक्यातील विजय साहेबराव दाबके (रा. अंधानेर) यांना विकला.
सहा दिवस आधीच प्लॉट नावावर : खरेदी केलेला प्लॉट वाघमारे यांचा असल्याचा संशय विजय दाबके यांना आला. त्यांनी 23 जानेवारी 2013 रोजी पुन्हा छायाबाई हिवराळे यांना उभे करून प्लॉट वाघमारेंच्या नावे केला. 29 जानेवारी रोजी वाघमारे प्लॉटवर गेल्या तेव्हा काही जणांनी प्लॉट कधी विकला, अशी विचारणा केली. त्या वेळी प्लॉट विकला नसल्याचे वाघमारेंनी सांगितले. प्रकरणाची खात्री करण्यासाठी वाघमारे यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन चौकशी केली असता हा प्लॉट पुन्हा त्यांच्या नावावर करण्यात आल्याचे निदर्शनास आले. वाघमारे यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्याशी संपर्क साधला. चौकशीअंती सिटी चौक पोलिसांनी छायाबाई हिवराळे आणि शंकर शेजूळ यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध 26 मार्च रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विलास ताटीकोंडलवार करत आहेत. न्यायालयाने शेजूळ आणि हिवराळे यांना 30 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
अशी घ्या प्लॉटची काळजी
मालकी हक्काच्या कागदपत्रांचा सर्च रिपोर्ट तयार करा. महसूल खात्यातील रेकॉर्डची स्वत: पडताळणी करा.
प्लॉटभोवती तारेचे कुंपण व पाटी लावायला हवी.
महसुली नोंदीचा सातबारा, खासगी मालमत्ता, मनपा, ग्रामपंचायत, सिडको, नगर भूरचना विभागात केलेल्या नोंदीचे क्रमांक पाटीवर लिहा.
अविनाश आघाव, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.