आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- रमजान ईदनिमित्त शहरातील मुख्य ईदगाह छावणी, उस्मानपुरा, रोजाबाग आणि सातारा तसेच प्रत्येक मशिदीसमोर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चंद्रदर्शनानुसार शुक्रवारी ईद साजरी केली जाणार आहे. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस यंत्रणेकडून खबरदारी घेतली जात आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपासून पोलिसांच्या बंदोबस्ताला सुरुवात झाली. 58 ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉइंट नेमण्यात आले आहेत. सर्व ठाण्यांचे पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक तसेच पुरुष व महिला कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात राहतील.

येथे असेल वाहनांची पार्किंग
छावणीच्या ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधव येणार असल्याने शुक्रवारी (9 ऑगस्ट) सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रवेशद्वार ते मिलींद चौक हा रस्ता वाहनांसाठी बंद राहिल. तसेच टाऊन हॉल, मलिक अंबर चौक, मकई गेट आणि बेगमपुर्‍याकडून येणार्‍या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आली आहे.

ज्युबिली पार्क, महेमूद दरवाजा, पानचक्कीकडून येणार्‍या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या मैदानात करण्यात आली असून, मिलकॉर्नर, बारापुल्ला गेटकडून येणार्‍या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था मिलिंद विज्ञान महाविद्यालयाच्या मागील बाजूच्या मैदानात करण्यात आली आहे. छावणी परिसरातून मिलिंद चौक मार्गे येणार्‍या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था मिलिंद विज्ञान महाविद्यालयाच्या समोरील वाहनतळावर करण्यात आल्याचे वाहतूक शाखेकडून कळवण्यात आले आहे.

आज मोंढा बंद
रमजान ईदनिमित्त शुक्रवारी मोंढा बंद ठेवण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी मनसुखलाल बांठिया, देवेंद्र सेठ, संजय कांकरिया, लक्ष्मीकांत दरख, मुकेश गुगळे, नीरज पाटणी, गणेश पगारिया यांची उपस्थिती होती.