आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Police Commissioner And Mp Chandrakant Khaire Issue

पोलिस आयुक्तांनी खुणावले, खैरे संतापले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बाप्पाला निरोप देण्यासाठी बुधवारी (19 सप्टेंबर) सकाळी 10.30 वाजता गणेश महासंघाचे पदाधिकारी शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीजवळ जमले होते. मात्र, खासदार चंद्रकांत खैरे दीड तास उशिरा आले. यामुळे पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी खासदार खैरेंना घड्याळातील वेळ दाखवून खुणावल्याने त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी आयुक्तांना अरेरावी केली. संतापलेल्या आयुक्तांनी फेटा काढून शिपायाकडे दिला आणि ते निघून गेले.

बुधवारी सकाळी विसर्जनापूर्वी 10.30 वाजता आरतीची वेळ होती. गणेश महासंघाचे अध्यक्ष बापू घडामोडे, आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, महापौर कला ओझा, पृथ्वीराज पवार यांच्यासह पदाधिकारी 11 वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी दाखल झाले. आरतीची संपूर्ण तयारी झालेली असताना सर्व पदाधिकारी केवळ खैरेंची प्रतीक्षा करत होते. फोनाफोनी केल्यानंतरही 10 मिनिटे, 15 मिनिटे अशी उत्तरे दिली जात होते. गणेशभक्तांची करमणूक करण्यासाठी दोन वेळा बँड पथकाने वाद्य वाजवले. याशिवाय दोन-दोन कप चहादेखील रिचवला. मात्र, खैरे काही आलेच नाहीत. भगवा फेटा बांधलेले पोलिस आयुक्त गणेश विसर्जनासाठी सजवलेल्या रथाच्या पाठीमागे नेहमी घड्याळाकडे पाहत होते. शेवटी दुपारी 12 च्या सुमारास खैरेंचे आगमन झाले. खैरे मंदिरात जात असतानाच पोलिस आयुक्तांनी त्यांना हातातील घड्याळ दाखवत (किती वेळ झाला) खुणावले. तेव्हा मंदिराकडे जाणारे खैरे पुन्हा मागे फिरले. त्यांनी पोलिस आयुक्तांना ‘थांबायचे असेल तर थांबा’ अशी अरेरावीची भाषा वापरली. यामुळे संतापलेल्या आयुक्तांनी डोक्यावरील फेटा काढत पोलिस शिपायाच्या हातात दिला.

हा प्रकार पाहून उपस्थित पदाधिकार्‍यांसह गणेशभक्त अवाक् झाले. जैस्वाल, पवारांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना न जुमानता ते निघाले. थोड्या अंतरावर उभे असलेले पोलिस निरीक्षक विजय सोनवणे यांना ‘वेळ व्यवस्थित सांगता येत नाही का ?’ असे खडे बोल सुनावत ते आरती न करताच निघून गेले.