आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Police Commissioner Rajendra Sinh News In Marathi

लोक म्हणतात, सिग्नल बसवा, खड्डे बुजवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कोणतीही दयामाया न बाळगता राजकीय दबाव झुगारून गुंडगिरी मोडून काढावी, असे मत व्यक्त करतानाच महापालिकेवर दबाव आणून वर्दळीच्या चौकात सिग्नल बसवून खड्डेही बुजवावेत, अशी अपेक्षा औरंगाबादकरांनी नवे पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांच्याकडून व्यक्त केली आहे.

पोलिस आयुक्त म्हणून 33 महिन्यांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर संजयकुमार शुक्रवारी (21 फेब्रुवारी) आपल्या पदाची सूत्रे राजेंद्र सिंह यांच्याकडे सोपवणार आहेत. नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून काम केलेले सिंह आणि संजय कुमार (1989) एकाच बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सिंह यांच्याकडून लोकांच्या काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘दिव्य मराठी’ने केला. तेव्हा कायदा सुव्यवस्था सांभाळण्यापलीकडे जाऊन मनपाचा कारभार सुधारण्याची भूमिकाही त्यांनी पार पाडावी, असा सूर व्यक्त झाला. प्रा. प्रेम खडकीकर म्हणाले की, त्यांनी वाहतूक सुरळीत करावी, तर मंगळसूत्र चोरांच्या मुसक्या बांधाव्यात, असे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी दिगंबर गाडेकर यांचे म्हणणे आहे. धार्मिक तेढ निर्माण करणार्‍यांच्या विरोधात कायद्याचा बडगा उगारण्याचे धारिष्ट्य दाखवावे, असे ठाकरेनगरातील ज्येष्ठ नागरिक के. के. मधाळे म्हणाले. एका युवतीने ‘महिला, तरुणींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.

राजेंद्र सिंह यांच्याकडून अपेक्षा
1. वाहतूक सुरळीत करावी.
2. मनपाला कामाला लावून वर्दळीच्या चौकात सिग्नल बसवावेत.
3. बांधकाम विभाग, मनपामार्फत खड्डे बुजवावेत.
4. अवैध धंदे, संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण आणावे.
5. मंगळसूत्र आणि वाहनचोरांच्या मुसक्या आवळाव्यात.
6. भूखंड घोटाळ्यांचे सूत्रधार जेरबंद करावेत.
7. दुचाकीवर भरधाव वेगाने जाणार्‍या कॉलेजकुमारांना पायबंद घालावा.
8. पोलिस-जनतेत प्रेमाचे नाते निर्माण करावे.

पोलिस आयुक्त म्हणतात, रुजू होताच काम सुरू
राजेंद्र सिंह यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क केला असता ते म्हणाले, ‘मी शुक्रवारी दुपारनंतर पदभार स्वीकारणार आहे. त्या वेळी सर्व परिस्थितीचा आढावा घेणार आहे. रुजू झाल्यानंतर लगेच आपण कामाला सुरुवात करणार आहोत. ज्या गोष्टींना प्राधान्य देणे गरजेचे आहे, त्या-त्या गोष्टींना दिले जाईल.’