आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरटे सीसीटीव्हीत कैद, पण पोलिसांना सापडेनात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मंगळसूत्र चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून सोमवारी या चोरट्यांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून दोन वृद्ध महिलांच्या सोन्याच्या चेन पळवल्या. सिडको एन-9, एन-1 भागात अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतराने या घटना घडल्या. जेथे हा प्रकार घडला तेथून पोलिस ठाणी हाकेच्या अंतरावर आहेत. दोन्ही चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात आले आहे. फुटेजमध्ये चोरट्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याने त्यांना पकडणे शक्य झाले नाही, असे पोलिस सांगतात.

सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास सुनीता ऊर्फ मीरा रमेशराव नाईक (64) या एन-9 मधील फरशी मैदानातून पायी जात होत्या. याच वेळी काळय़ा रंगाच्या दुचाकीवर पाठीमागून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळय़ातील दोन तोळय़ांची चेन हिसकावली. यानंतर सिडको एमआयडीसीच्या चौकीसमोर असलेल्या सुंदर प्लाझाच्या व्ही विंगमध्ये राहणार्‍या स्वाती गोपाळकृष्ण कुलकर्णी (70) यांच्याकडे चोरट्यांनी मोर्चा वळवला. त्या घराबाहेर मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सव्वा तोळय़ाची चेन हिसकावली.

असे आहे चोरट्यांचे वर्णन
काळय़ा रंगाची दुचाकी, पाठीमागील चोराने निळसर रंगाचा हाफ शर्ट आणि लाल रंगाची टोपी परिधान केली होती, तर दुचाकीस्वार जाडजूड होता.

चौकीत कुणीच नव्हते
दोन्ही घटनांच्या वेळी घटनास्थळापासून जवळच असणार्‍या पोलिस चौकीमध्ये एकही कर्मचारी नव्हता. तो असता तर कदाचित चोरटे पकडले गेले असते.