आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्‍हा पोलीस लाच घेण्‍यासाठी पोलिसालाच अटक करतो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- धूत हॉस्पिटलसमोर लघुशंकेसाठी उभ्या असलेल्या पोलिस मुख्यालयातील शिपायाला पाचशे रुपयांची मागणी करत गाडीत डांबल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या दोन कर्मचा-यांविरुद्ध तक्रार देण्यात आली असून याबाबत चौकशी करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक सोनवणे यांनी दिली.
नातेवाईक उपचार घेत असल्याने पोलिस मुख्यालयातील शिपाई संजय अंतरकर (रा. म्हाडा कॉलनी, मुकुंदवाडी) हे शुक्रवारी रात्री धूत हॉस्पिटल येथे आले होते. हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या जागेत ते लघुशंकेसाठी थांबलेले असताना सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यातील सोनवणे आणि जगदाळे असे दोन कर्मचारी त्यांच्याजवळ आले. येथे लघुशंका का केली, असे धमकावत अंतरकर यांना त्यांनी पाचशे रुपयांचा दंड भरावा लागेल, असा दम भरला. त्या वेळी अंतरकर यांनी दोघांना याचा जाब विचारला. तेव्हा त्यांनी अंतरकरांना मोबाइल व्हॅनमध्ये डांबत पोलिस ठाण्यात नेले. तेथे गेल्यावर अंतरकरांना पाहून इतर ओळखीचे कर्मचारी अवाक झाले. अंतरकरांनी ठाण्यात गेल्यानंतर आपली ओळख पोलिसांना सांगितली. त्यानंतर सोनवणे आणि जगदाळे त्यांना तेथे सोडून निघून गेले. शनिवारी सकाळी अंतरकरांनी दोघांविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, अंतरकरांनी दिलेली तक्रार प्राप्त झाली असून सोनवणे आणि जगदाळे या दोघांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे पोलिस निरीक्षक अशोक सोनवणे यांनी सांगितले.