आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निनावी फोन आला आणि पोलिसांनी बालविवाह रोखला, हर्सूल परिसरातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हर्सूल परिसरातील फुलेनगर येथे राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीचे लग्न लावून देण्यात येत असल्याची माहिती निनावी फोनद्वारे हर्सूल पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ धाव घेत हे लग्न रोखले. शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. मुलीसह तिचे आई-वडील आणि नातेवाइकांना ठाण्यात बोलावून हा गुन्हा असल्याचे समजावून सांगितले. तसेच मुलगी सज्ञान होईपर्यंत तिचा विवाह करणार नाही, असे त्यांच्याकडून लिहून घेतले. या १६ वर्षीय मुलीचा या लग्नाला विरोध असताना तिचे आई-वडील बळजबरीने लग्न लावून देत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 
 
असा घडला प्रकार 
कन्नड येथील मुलाशी साखरपुडा आणि लग्न करण्याचा कार्यक्रम फुलेनगरातील एका धार्मिक स्थळी होणार असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्यासह सहायक फौजदार सोन्ने, कॉन्स्टेबल काळे, पाटील यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. साखरपुड्याचा कार्यक्रम आहे का? असे पोलिसांनी मुलीच्या वडिलांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी मुलीला विचारले असता तिने लग्न होत असल्याचे सांगितले. 
 
पालकांना नोटीस 
पोलिसांनी मुलीसह आई-वडील नातेवाइकांना ठाण्यात आणले. पोलिसांनी त्यांचे समुपदेशन करून मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तिचे लग्न करू नये, अशी नोटीस बजावली. ही मुलगी अल्पवयीन असून तिचे आई-वडील मजुरी करतात. इयत्ता सातवीपर्यंत तिचे शिक्षण झाले आहे. कन्नड येथील एका मजुराशी तिचे लग्न ठरवले होते, अशी माहिती पोलिस निरीक्षक कल्याणकर यांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...