आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Politician Comment On R R Patil Death

आर आर पाटील म्हणजे पोलिसांचा पालक अन् सामान्यांचा नेता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे कॅन्सरमुळे निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील राजकारणी, समाजकारणी गमावल्याची शोकसंवेदना विविध पक्षातील नेत्यांनी व्यक्त केली.
पक्षभेद बाजूला ठेवून त्यांनी नेहमीच आदर्श राजकारण केले. त्यांच्या रूपाने ग्रामीण भागाला नेतृत्व मिळाले होते. पोलिसांच्या कल्याणासाठी त्यांनी नेहमीच उत्तम योजना राबवल्या. ते खऱ्या अर्थाने पोलिसांचे पालक होते, अशी भावना पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आबा नेहमी प्रयत्नशील असायचे. सामान्यांशी त्यांची नाळ जुळलेली होती. राजकारणात कायम आव्हान स्वीकारणारे आबा शेवटचे आव्हान स्वीकारू शकले नाहीत, अशी खंत विधानसभेतील त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली.

मंत्री असतानाही सर्वसामान्यांप्रमाणे जगणाऱ्या आबांबद्दल सर्व पक्षात आदराची भावना
तळमळीचा नेता हरपला
^१९९० मध्ये आम्ही सोबत आमदार झालो. गृहनिर्माणमंत्री झाल्यानंतर त्यांनी माझे अभिनंदन केले. हृदयविकाराचा झटका आला तेव्हा माझ्या भेटीसाठी ते आले. राजकारणापलीकडचा आमचा स्नेह होता. गृहमंत्री असताना पक्षभेद बाजूला ठेवून त्यांनी आदर्श राजकारण केले. चंद्रकांत खैरे, खासदार.
कार्यकर्त्यांना बळ दिले

^सामान्य कार्यकर्त्याला सहज आपलेसे करणारे ते लोकनेते होते. केवळ लोकशाहीच्या बळावर आबा राजकारणात यशस्वी झाले होते. मी निवडणूक लढवताना फॉर्म भरण्यासाठी ते एका फोनवर शहरात आले. सामान्यांचे प्रश्न त्यांनी तत्काळ सोडवले. सतीश चव्हाण, आमदार.
शेवटचे आव्हान स्वीकारले नाही
^सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये महत्त्वाकांक्षा असेल, तर तो चांगला नेता होऊ शकतो, हे आबांनी दाखवून दिले.कायम आव्हान स्वीकारणारे आबा शेवटचे आव्हान स्वीकारू शकले नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे. संजय शिरसाट, आमदार शिवसेना.
सदैव सर्वांच्या स्मरणात राहतील

^ भारत बटालियन सांगलीत व्हावे, अशी त्यांची इच्छा असताना केवळ माझा प्रस्ताव मान्य करत त्यांनी ही बटालियन औरंगाबादला मान्य केली. ते नेहमी सर्वांच्या स्मरणात राहतील.
राजेंद्र दर्डा, माजी शिक्षण मंत्री.
निर्मळ मनाचा माणूस

^आबांच्या निधनामुळे निर्मळ मनाचा माणूस आपण गमावला आहे. त्यांच्या कारकीर्दीत त्यांच्यावर कधीच डाग लागला नाही. त्यामुळे राजकारणाचीदेखील मोठी हानी झाली आहे.
केशवराव औताडे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस. ''
कार्यकर्त्यांची जाण

^आबांनी पैठणमधील बिडकीन, पाचोड आणि पैठण या पोलिस ठाण्यांसाठी १० कोटी रुपये दिले होते.आबांच्या जाण्याने चांगला माणूस आणि कार्यकर्त्यांची जाण ठेवणारा नेता हरपला.
संजय वाघचौरे, माजी आमदार. '
गृहखात्याला शिस्त लावली
^आबांनी गृहखात्याला शिस्त लावली. सामान्यांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर होता. सर्वच पक्षांत त्यांच्याबाबत आदराची भावना होती. मनमिळाऊ नेता हरपला. अतुल सावे, आमदार भाजप. ''
ग्रामीण नेतृत्व पडद्याआड

^आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे राज्यातील ग्रामीण भागासाठी काम करणारे नेतृत्व हरपले. ग्रामविकासमंत्री असताना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देऊन संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व नंतर गृहमंत्री झाल्यानंतर महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान ग्रामीण भागात यशस्वीपणे राबवले. डॉ. कल्याण काळे, माजी आमदार.
एक प्रामाणिक राजकारणी

^आर. आर. पाटील गेल्याचे वृत्त धक्कादायक आहे. ते खऱ्या अर्थाने पोलिसांचे पालक होते. एक प्रामाणिक आणि नैतिकतापूर्ण राजकारणी म्हणून त्यांचा कायम अनुभव आला आहे. चांगले राजकारणी म्हणून ते सदैव सर्वांच्या स्मरणात राहतील. - राजेंद्र सिंह, पोलिस आयुक्त.
मी लोकांसाठीच
^सन २००५ मध्ये सुभेदारीवर बंदोबस्ताला असताना निवेदने देण्यासाठी नागरिक, कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. आदेश असल्याने आत कोणालाही आत जाऊ दिले नाही. हे कळल्यावर ते स्वत: बाहेर आले व मी लोकांसाठी आहे, त्यांना भेटू द्या, असे म्हणाले.
- कैलास प्रजापती, पोलिस निरीक्षक.